तुम्हाला न्यायव्यवस्था बंद पाडायची आहे का ? कोर्टाने केंद्राला खडसावलं

October 28, 2016 8:54 PM0 commentsViews:

modi sarkar_supreme court28 ऑक्टोबर : केंद्र सरकार आणि न्यायपालिकेतला वाद आता आणखी उग्र होत चाललाय. सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने सुचवलेल्या न्यायाधीशांची नेमणूक करायला केंद्र सरकार टाळाटाळ करतंय, असं कोर्टाचं म्हणणं आहे. ‘तुम्हाला न्यायव्यवस्था बंद पाडायची आहे का?’ अशा जळजळीत शब्दात केंद्र सरकारवर टीका केलीय.

भारताचे सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्या नेतृत्वाखालच्या सुप्रीम कोर्ट बेंचने ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगींना ख़डसावलं. न्यायाधीशांच्या नेमणुका वेळेत केल्या नाही तर पंतप्रधान कार्यालयाच्या सचिवांना सुप्रीम कोर्टात बोलावलं जाईल, असा इशारा सुप्रीम कोर्टाने दिलाय. न्यायाधीशांच्या नेमणुकीवरून केंद्र सरकार आणि सुप्रीम कोर्टात गेलं वर्षभर वाद सुरू आहे. न्यायाधीशांच्या नेमणुकीसाठी सध्या प्रचलित असलेल्या कॉलेजियम पद्धतीला केंद्र सरकारचा विरोध आहे. त्यामुळे या कॉलेजियमने सुचवलेल्या न्यायाधीशांच्या नेमणुका करायला सरकार टाळाटाळ करतंय, असा सुप्रीम कोर्टाचा आक्षेप आहे.

सुप्रीम कोर्टाचा केंद्राला इशारा
– कर्नाटक हायकोर्टात न्यायाधीशांच्या नेमणुका न झाल्याने अनेक कोर्टरूम्स बंद आहेत.
– याआधी न्यायाधीश जास्त आणि कोर्टरूम्स कमी अशी परिस्थिती असायची पण आता न्यायाधीशच नाहीत. आता कोर्टच बंद करा!
– सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने सुचवलेल्या न्यायाधीशांच्या नेमणुका अजूनही झालेल्या नाहीत.
– गेले 9 महिने तुम्ही काय करताय? कशाची वाट पाहताय?
– आम्हाला कोणाशीही संघर्ष नकोय. हा प्रश्न इगोचा नाही.पण या वादामुळे देशातल्या व्यवस्थेवर परिणाम होतोय.

काय आहे कॉलेजियम पद्धत ?
न्यायाधीशांची नेमणूक करण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची एक समिती
भारताचे सरन्यायाधीश हे या समितीचे अध्यक्ष असतात.
ही समिती न्यायाधीशांच्या नेमणुकीची शिफारस करते.
1990 पासून ही कॉलेजियम पद्धत अस्तित्वात आहे.
न्यायव्यवस्थेतल्या व्यक्तीच न्यायाधीशांची नेमणूक करत असल्यामुळे कॉलेजियम पद्धतीला आक्षेप घेतला जातो.
न्यायाधीशांच्या नेमणुकीसाठी संसदेने राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग मंजूर केला होता.
हा कायदा 2015 मध्ये सुप्रीम कोर्टाने फेटाळला आणि कॉलेजियम पद्धतच सुरू राहील, असा निर्णय दिला.
यानंतर केंद्र सरकार आणि सुप्रीम कोर्टामधला संघर्ष तीव्र झाला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close