यंदाची दिवाळी जवानांना समर्पित करा – मोदी

October 30, 2016 2:04 PM0 commentsViews:

modi_man_ki_baat

30 ऑक्टोबर :  देशातील विविध सुरक्षा दलांमध्ये कार्यरत असलेल्या जवानांमुळेच आपण दिवाळी साजरी करु शकतो. त्यामुळेयंदाची दिवाळी आपण त्यांना समर्पित करु असं आवाहन मोदींनी केलं. दिवाळी हा अंधारातून प्रकाशाकडे नेणारा उत्सव असून हा उत्सव आता फक्त भारतातच नव्हे तर जगभरात साजरा होतो असंही त्यांनी आवर्जून सांगितलं.

मोदींनी रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे देशवासीयांना संबोधित केलं आहे. दिवाळीच्या आधी घराघरात स्वच्छता अभियान राबवलं जातं असं नरेंद्र मोदींनी सांगितलं. दिवाळीचं महत्त्व अधोरेखित करत मोदी म्हणाले, आपल्या उत्सवामध्ये परंपरेला विज्ञानाची जोड आहे. प्रकाशाकडे नेणाऱ्या उत्सवातून प्रेरणा मिळते. म्हणूनच आता जगभरात हा उत्सव साजरा केला जात आहे. अमेरिका, कॅनडा , ब्रिटन, सिंगापूरमधील दिवाळी साजरी केल्याचे दाखलेही त्यांनी दिले आहेत. दिवाळी निमित्त जवानांना संदेश देण्याच्या आवाहनाला भरभरुन प्रतिसाद देणाऱ्या क्रीडापटू, अभिनेते आणि सर्व सामान्यांचे त्यांनी कौतुक केलं.

सैन्य,सीमा सुरक्षा दल, सीआरपीएफ असे कोणतेही सुरक्ष दल असो या जवानांमुळेच आपण दिवाळी साजरी करु शकतो. यंदाची दिवाळी आपण त्यांना समर्पित करु असं आवाहन मोदींनी केलं. आयुष्यातील प्रत्येक वळणावर हे जवान राष्ट्रहिताला प्राधान्य देतात असंही ते म्हणालेत.

त्याचबरोबर, ३१ ऑक्टोबररोजी सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभरात एकता दिवस साजरा केला जाणार आहे. तसंच इंदिरा गांधी यांच्या पूण्यतिथीनिमित्त त्यांनादेखील श्रद्धांजली अर्पण करु असे मोदींनी स्पष्ट केलं. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर सरदार यांच्या जन्मदिनीच सरदारांवर (शीखांवर) अत्याचार झाले हे दुर्दैवी आहे. पण आपण आता एकतेचे दर्शन घडवलं पाहिजे. विविधतेत एकता ही भारताची शक्ती आहे असंही त्यांनी सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close