मुंबईत फटाक्यांमुळे प्रदूषणात वाढ

October 31, 2016 6:18 PM0 commentsViews:

BJP Supporters

31ऑक्टोबर: यावर्षी दिवाळीत फटाके वाजवू नका म्हणून भरपूर जनजागृती करण्यात आली. पण जसजशी दिवाळी रंगत चाललीय तसतसं फटाके वाजवण्याचं प्रमाण पुन्हा वाढलंय. यामुळे मुंबईच्या प्रदूषणात भर पडलीय आणि कचराही वाढलाय. मुंबईकर मरिन ड्राईव्ह आणि वरळीच्या चौपाटीवर जाऊन फटाके वाजवतात. त्यामुळे या चौपाट्यांवरही धुराचं साम्राज्य आहे. फटाक्यांच्या धुरामुळे निर्माण झालेला थरही स्पष्ट दिसतोय.

मुंबईकर जिथे स्वच्छ हवा घेण्यासाठी मॉनिर्ंग वॉकला येतात तिथेच श्‍वास घेण्यासाठी एवढा त्रास होत असेल तर पूर्ण शहरामध्ये काय अवस्था असेल याची कल्पना केलेली बरी. शाळकरी मुलांपर्यंत  फटाके न वाजवण्याचा संदेश पोहोचवला जातो. पण मोठ्यांपर्यंत मात्र हा संदेश पोहोचलेला दिसत नाही. मुंबईत पश्चिम उपनगरात अंधेरी आणि मालाडमध्ये जास्त प्रदूषण असल्यामुळे इथल्या हवेची पातळी खालावलीय. नवी मुंबईतही जास्त प्रमाणात प्रदूषणाची नोंद झालीय. रॉकेट बॉम्ब आणि फटाक्यांच्या लडींमुळे जास्त प्रदूषण होतं. आतषबाजीमध्ये असे फटाके टाळायला हवेत पण याच फटाक्यांचं प्रमाण वाढलंय.

असं असलं तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी फटाक्यांचं प्रमाण कमी आहे, असं मुंबईच्या वेगवेगळ्या भागातल्या रहिवाशांचं म्हणणं आहे. यावर्षी दिवाळीला फटाक्यांची खरेदी कमी केली, असंही मुंबईकर आवर्जून सांगतायत. फटाक्यांचे दुष्परिणाम, प्रदूषण, सुरक्षितता या सगळ्याच कारणांमुळे फटाके खरेदी कमी झालीय. हीच जागरुकता मुंबईकरांनी बाळगली तर पुढच्या वर्षी फटाक्यांचं प्रमाण आणखी कमी होईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही.

close