पाकिस्तानच्या गोळीबारात सात जणांचा मृत्यू, आठ जखमी

November 1, 2016 4:22 PM0 commentsViews:

ceasefire

01 नोव्हेंबर : गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीर सीमेवर पाकिस्तानकडून होणारा गोळीबार सातत्यानं सुरूच आहे. पाकिस्तानच्या गोळीबारात सीमारेषेवरील गावात राहणाऱ्या 7  जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन लहान मुलांचाही समावेश आहे. तर आठ जण या गोळीबारात जखमी झाले आहेत. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनीही पाकच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं.

मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास पाकिस्तानने आरएस पुरा सेक्टरमध्ये गोळीबार केला. यात छोट्या तोफांनी भारतीय चौक्यांवर मारा करण्यात आला. सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनीही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानी सैन्याने छोट्या तोफांचा वापर केल्याने यात सीमारेषेवरील अर्निया सेक्टरमधील घरांचे नुकसान झाले. तर पूंछ आणि सांबा सेक्टरमध्ये पाकच्या गोळीबारामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे.

भारतात दिवाळी सण साजरा होत असताना पाकिस्तानी सैन्याकडून सीमारेषेवर कुरापती वाढल्या असून यामुळे तणाव निर्माण झाला आहे. रविवारी रात्री पाकिस्तानी सैन्यांनी जम्मू-काश्मीरमधील राजौरी आणि मेंढर सेक्टरमध्ये केलेल्या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद आणि एक महिलेचा मृत्यू झाला, तसेच पाक सैनिकांनी मेंढरमधील बोलाकोट इथे देखील शस्त्रसंधीचे उल्लंघन केलं. यात दोन भारतीय सैनिक जखमी झाले होते. गेल्या काही दिवसांत वारंवार होत असलेल्या गोळीबारामुळे सीमा भागात राहणाऱ्या नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यांचे दैनंदिन जीवन अस्ताव्यस्त झाले आहे. सीमेवरील गावांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close