सैनिकाच्या मृत्यूचं राजकारण : राहुल गांधींना दोनदा घेतलं ताब्यात

November 2, 2016 4:08 PM0 commentsViews:

BRKING940_201611021827_940x355

02 नोव्हेंबर – ‘वन रँक वन पेन्शन’च्या अमलबजावणीच्या मागणीसाठी एका निवृत्त सैनिकाने आत्महत्या केल्याच्या घटनेवरून आता राजकारण चांगलंच तापू लागलंय. या सैनिकाच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेलेल्या राहुल गांधींना रुग्णालयात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आलं होतं. त्यांना ताब्यात घेऊन सोडण्यात आलं होतं. पण राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेते पुन्हा राममनोहर लोहिया रुग्णालयाजवळ गेले. तिथे त्यांना पुन्हा ताब्यात घेऊन सोडून देण्यात आलं. राहुल गांधींच्या सोबत ज्योतिरादित्य शिंदे, अजय माकन, सज्जन कुमार, भूपिंदर हुडा यांनाही ताब्यात घेण्यात आलंय.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मोदी सरकार लोकशाहीविरोधी आहे आणि सैनिकाच्या कुटुंबीयांना भेटण्यापासून कुणाला रोखण्याची ही पहिलीच वेळ आहे, अशी टीका राहुल गांधींनी केलीय. हा मोदीजींचा भारत आहे, असा टोलाही त्यांनी लगावलाय.

दिल्लीतल्या जंतरमंतर इथे ‘वन रँक वन पेन्शन’च्या अमलबजावीच्या मागणीसाठी सैनिकांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनासाठी आलेले निवृत्त सैनिक राम किशन ग्रेवाल यांनी आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे दिल्लीतल्या राममनोहर लोहिया रुग्णालयात पोहोचले. पण रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच पोलिसांनी राहुल गांधींना अडवलं. नेत्यांसोबतच सर्वसामान्य नागरिकांनाही रुग्णालयामध्ये प्रवेश करू दिली जात नाहीये.

या प्रकारानंतर राहुल गांधी संतापले आणि तिथेच थांबले. त्यानंतर त्यांनी मीडियासमोरच पोलिसांचीच कोंडी करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही मला आतमध्ये प्रवेश का नाकारला हे सर्वांसमोरच सांगा,असा जाब राहुल गांधींनी विचारला. ही मोदी सरकारची हुकूमशाही आहे. शहिदांच्या कुटुंबांना भेटण्यापासून का रोखलं, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केलाय.

दरम्यान, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आपच्या नेत्यांनीही या प्रकारावर नाराजी व्यक्त केलीय. मोदी सरकारमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केलीय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close