हिलरी आणि ट्रम्प यांच्यात अटीतटीची लढत

November 2, 2016 4:36 PM0 commentsViews:

turmp and hillery

02 नोव्हेंबर - अमेरिकेमध्ये 8 नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये हिलरी क्लिंटन बाजी मारणार की डॉनल्ड ट्रम्प पुन्हा आघाडी घेणार याबद्दल चर्चा रंगलीय. नुकत्याच राष्ट्रीय पातळीवर झालेल्या एका सर्व्हेमध्ये डॉनल्ड ट्रम्प हे हिलरींपेक्षा एका पॉइंटने आघाडीवर आहेत. एबीसी न्यूज आणि वॉशिंग्टन पोस्टने हा सर्व्हे केलाय. डॉनल्ड ट्रम्प यांना 46 टक्के मतदारांनी पसंती दिलीय तर हिलरी क्लिंटन यांना 45 टक्के मतदारांची पसंती आहे.

निवडणुकीला अवघे काही दिवस राहिले असताना हिलरी क्लिंटन यांना त्यांचं ई मेल प्रकरण भोवणार, असं दिसतंय. परराष्ट्र मंत्री असताना हिलरींनी कार्यालयीन कामासाठी खाजगी ई मेल आयडीचा वापर केला होता. हे प्रकरण उघड झाल्यानंतर अमेरिकेत हिलरींच्या विरुद्ध वादळ उठलं होतं. याबद्दल अजूनही चौकशी सुरू आहे, असं आता एफबीआयने म्हटलंय. त्यामुळे हिलरी पुन्हा अडचणीत आल्यायत.

याचा फायदा उठवत डॉनल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर हिलरींच्या विरोधात पुन्हा एकदा जोरदार मोहीम उघडलीय. याआधी डॉनल्ड ट्रम्प हे महिलांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वादाच्या भोवर्‍यात अडकले होते. त्यातच ट्रम्प यांच्यावर रशियाचे हस्तक असल्याचा आरोप होतोय.

दोन्ही उमेदवारांमध्ये सध्या आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत, वेगवेगळ्या सर्व्हेचे निष्कर्ष येतायत. त्यावरून तरी डॉनल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन यांच्यात अटीतटीचा सामना होणार,असंच दिसतंय. हिलरी क्लिंटन यांच्यापुढचं आव्हान शेवटपर्यंत कायम राहण्याची चिन्हं आहेत.

एका सर्व्हेनुसार गेल्या 2 आठवड्यांत व्हजिर्नियासारख्या राज्यात हिलरी क्लिंटन या आघाडीवर होत्या. पण आता तिथेच डॉनल्ड ट्रम्प सहा पॉइंट्सने आघाडीवर आहेत. याच गेल्या 2 आठवड्यांमध्ये ट्रम्प यांनी जाहिरातींवर 30 लाख डॉलर्स खर्च केलेत. अमेरिकेत आत्ता वेगवेगळ्या प्रकारचे सर्व्हे येत असले तरी एका विश्‍वासार्ह सर्व्हेमध्ये हिलरी क्लिंटन याच अमेरिकेची निवडणूक जिंकतील, असं म्हटलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close