काश्मीरमध्ये गेल्या 2 महिन्यांत 25 शाळा जाळल्या

November 2, 2016 5:11 PM0 commentsViews:

kasmir school

02 नोव्हेंबर - हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर बुर्‍हाण वणी मारला गेल्यानंतर काश्मीर अजूनही धुमसतंच आहे. जुलै महिन्यातल्या या घटनेनंतर गेले 4 महिने काश्मीर अशांत आहे.याचा सगळ्यात जास्त फटका बसलाय तो तिथल्या शाळांना. काश्मीरमध्ये गेल्या 2 महिन्यांत 25 शाळा जाळण्यात आल्या, अशी धक्कादायक माहिती समोर आलीय.

कोर्टाने याची गंभीर दखल घेतलीय आणि सरकारला शाळांना संरक्षण देण्याच्या सूचना दिल्यायत. गेल्या रविवारीच काही अज्ञात इसमांनी अनंतनागमधल्या काबामार्ग शाळेला आग लावली. आणखीही 3 शाळांवर अशाच प्रकारचे हल्ले करण्यात आलेत. या दुर्घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कारण काश्मीरमधल्या अशांततेमुळे गेल्या 4 महिन्यांपासून शाळा बंद आहेत.

शाळा जाळण्याच्या या प्रकाराबद्दल जम्मू काश्मीर सरकारने फुटीरतावाद्यांवर ठपका ठेवलाय. हुरियतचे नेते सय्यद अली शाह गिलानी आणि त्यांच्या सहकार्‍यांनीच काश्मीरमधल्या शाळा बंद पाडल्यायत, शाळा जाळण्याच्या कृत्यालाही याच नेत्यांनी चिथावणी दिलीय, असं काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंग यांनी म्हटलंय. फुटीरतावद्यांच्या या कृत्यामुळे काश्मीरमधल्या मुलांचं भवितव्य मात्र अंधारात आहे, असंही ते म्हणाले.

फुटीरतावादी अशा कृत्यांमुळे पाकिस्तानच्या कारवायांना खतपाणी घालतायत, अशी टीका केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनीही केलीय. पण फुटीरतावादी नेते यासिन मलिक यांनी मात्र शाळांवर गल्ले करणार्‍यांना कठोर शिक्षा करायला हवी, असं म्हटलंय.

काश्मीरमध्ये दगडफेक करणार्‍यांना सरकारने अटक केली पण शाळा जाळणार्‍यांच्या विरोधात कोणतीही कारवाई केली जात नाहीये, असा आरोप काश्मीर इकॉनॉमिक अलायन्सचे उद्योजक मोहम्मद यासीन खान यांनी केलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close