टाटाच्या मुख्यालयाबाहेर सुरक्षारक्षकांची प्रेस फोटोग्राफर्सना मारहाण

November 4, 2016 6:13 PM0 commentsViews:

tata_bombay_houseमुंबई, 04 नोव्हेंबर : टाटा समुहातून हकालपट्टी करण्यात आलेले सायरस मिस्त्री आज मुंबईतील टाटा समुहाच्या ‘बॉम्बे हाऊस’मधील मुख्यालयात पोहचले असता फोटो काढणा-या प्रेस फोटोग्राफ र्सवर सुरक्षारक्षकांनी हल्ला चढवला. सुरक्षारक्षकांनी प्रेस फोटोग्राफरला बेदम मारहाण केली. या मारहाणीत 3 फोटोग्राफर्स जखमी झाले आहे.

सायरस मिस्त्री आज टाटा समुहाच्या ‘बॉम्बे हाऊस’मधील मुख्यालयात पहिल्या बैठकीसाठी आले होते. त्यावेळी मीडियाच्या प्रतिनिधी आणि प्रेस फोटोग्राफरनी नेहमी प्रमाणे हजेरी लावली होती. सायरस मिस्त्री जेव्हा मुख्यालयात प्रवेश करत होते. त्यावेळी फोटोग्राफर पुढे सरसावले. पण टाटा समुहाकडून तैनात करण्यात आलेल्या टॉप्स सुरक्षा कंपनीच्या रक्षकांनी प्रेस फोटोग्राफर्सला मज्जाव केला. त्यांना धक्काबुकी करून दूर सारण्याचा प्रयत्न केला. तरीही कर्तव्य म्हणून फोटोग्राफर्सनी फोटो काढण्याचा प्रयत्न कायम ठेवला.

तोपर्यंत सायरस मिस्त्री मुख्यालयात पोहचले. त्यानंतर फोटोग्राफर्स माघारी परतले. प्रकरण शांत झाल्यानंतर अचानकपणे सुरक्षारक्षक बाहेर आले आणि त्यांनी फोटोग्राफर्सवर एकच हल्ला चढवला. दिसेल त्या फोटोग्राफर्सला सुरक्षारक्षकांनी बेदम मारहाण केली.

एवढंच नाहीतर सुरक्षारक्षकांनी प्रेस फोटोग्राफर्सना पाठलाग करून मारहाण केली. या मारहाणीत टाइम्स ऑफ इंडियाचे संत कुमार, हिंदुस्तान टाईम्सचे अरजित सिंग आणि मिड डेचे फोटोग्राफर अतुल कांबळे जखमी झाले आहे. या प्रकरणी प्रेस फोटोग्राफर्स संघटनेनं सुरक्षारक्षकांविरोधात माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close