मुंबापुरीत भगवं वादळ, शिस्तबद्ध बाईक रॅलीचा आदर्श

November 6, 2016 12:05 PM0 commentsViews:

rally_baneer

06 नोव्हेंबर : राज्यभरात मराठा मोर्च्याचं वादळ आता राजधानी मुंबईत येऊन धडकलंय. या मोर्च्याची आज रंगीत तालीम म्हणून बाईक रॅली काढण्यात आली. हजारोच्या संख्येनं दुचाकीस्वार या रॅलीत सहभागी झाले होते.  भगवे फेटे आणि बाईकला भगवा ध्वज लावून मराठा समाजातील तरुण सहभागी झाले होते.

कोपर्डी प्रकरणानंतर राज्यभरात मराठा समाजाचे मूक क्रांती मोर्चे निघाले. लाखोंच्या संख्येनं निघालेल्या या मार्च्यांनी राज्य सरकारला  आपली दखल घेण्यास भाग पाडलं. दिवाळीमुळे मराठा मोर्चाने थोडी विश्रांती घेतली. पण, दिवाळीनंतर मुंबई आणि नागपूर अधिवेशनावर मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले. याच एक भाग म्हणून आज मुंबईत बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. सोमय्या मैदान ते छत्रपती शिवाजी टर्मिनस अशी बाईक रॅली काढण्यात आलीये. सोमय्या मैदानावरून सकाळी 9 वाजता निघणारी  रॅली मात्र तासाभऱाच्या उशिराने सुरू झाली.

ही बाईक रॅली सायन सर्कलहून सायन रूग्णालय, माटुंगा सर्कल, दादर, परळ, लालबाग, भायखळाहून थेट सीएसटी रेल्वे स्थानकासमोर पोहोचली. सीएसटीला छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आणि कोपर्डीची घटनेतील पीडितेचा श्रद्धांजली स्तंभ उभारून रॅलीची सांगता करण्यात आली. या रॅलीचं नेतृत्व महिलांकडे सोपवण्यात आलं होतं.  या रॅलीत भाजपचे मुंबईचे शहराध्यक्ष आशिष शेलारही सहभागी झाले होते. ही रॅली यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोर्चामुळे काही काळ दादर, सायन परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. मात्र नंतर वाहतून सुरळीत झालीय.  कोणताही गोंगाट न करता अंत्यत शिस्तबद्ध पद्धतीने ही रॅली यशस्वीपणे पार पडली. साधारणपणे या रॅलीत 25 हजार दुचाकीस्वार सहभागी झाले होते असा दावा आयोजकांनी केलाय.
 


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close