अमेरिकेत आज मतदान, राष्ट्राध्यक्षासाठी अमेरिकन जनता देणार कौल

November 8, 2016 12:11 AM0 commentsViews:

trump vs hillary clinton 08 नोव्हेंबर : अमेरिकेमध्ये आज राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होतेय. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डॉनल्ड ट्रम्प यांच्यामध्ये अटीतटीची लढत आहे. आतापर्यंत आलेल्या जनमत चाचण्यांमध्ये हिलरींचा विजय निश्चित मानला जात असला तरी डॉनल्ड ट्रम्प यांनीही हिलरींपुढे मोठं आव्हान उभं केलंय.

मतदानाच्या आधी शनिवार आणि रविवारी या दोन्ही उमेदवारांनी फ्लोरिडा, ओहायो यांसारख्या महत्त्वाच्या राज्यांत प्रचार करण्यावर भर दिला. हिलरींनी ओहायोमध्ये बास्केटबॉल स्टार लेब्रॉन जेम्ससोबत प्रचार केला. तर डॉनल्ड ट्रम्प यांनी पेनसिल्व्हेनिया, नेवाडा या राज्यांत प्रचारसभा घेतल्या.

रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे बालेकिल्ले राखण्यावर त्यांच्या प्रचाराचा भर आहेच. शिवाय फ्लोरिडा, ओहायो यासारखी राज्यं, जी कोणत्याही पक्षाच्या बाजूने जाऊ शकतात तिथेही जोरदार प्रचार करण्यात येतोय. अमेरिकेत कृष्णवर्णीय आणि लॅटिन अमेरिकन मतदार कुणाला मतं देतात यावरही या दोन्ही उमेदवाराचं भवितव्य अवलंबून आहे. अमेरिकेतले गोरे लोक ट्रम्प यांच्या बाजूने आहेत तर हिलरींना महिलांचा पाठिंबा मिळतोय.

अमेरिकेत 8 नोव्हेंबरला मतदान झाल्यानंतर 9 नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत निकाल येऊ शकतो. राजकारणाचा गाढा अनुभव असलेल्या हिलरी क्लिंटन आणि त्यांना आव्हान देणारे भांडवलदार उमेदवार डॉनल्ड ट्रम्प यांच्यात कोण बाजी मारतो ते पाहावं लागेल. या निवडणुकीत उपराष्ट्राध्यक्षही निवडले जाणार आहेत. डेमोक्रॅटिक पक्षातर्फे टीम केन आणि रिपब्लिकन पक्षातर्फे माईक पेन्स हे उमेदवार उपराष्ट्राध्यक्षपदासाठी रिंगणात आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close