अप्पर हेडलाईटकडे 1 मिनिट पाहण्याची शिक्षा !

November 8, 2016 6:06 PM0 commentsViews:

08 नोव्हेंबर : हेडलाईट अप्पर ठेवून गाडी चालवणाऱ्यांचा इतरांना किती त्रास होतो, याची प्रत्येकाला जाणीव असते. अशा धोकादायक वाहचालकांना वठणीवर आणण्यासाठी चीनमधल्या शेन्झेन पोलिसांनी अनोखी मोहीम सुरू केलीय. अशा वाहनचालकांना प्रखर अप्पर हेडलाईटकडे तब्बल एक मिनिट टक लावून बघण्याची शिक्षा दिली जाते.

रात्रीच्या वेळेस गाडी चालवणाऱ्यांची सर्वात मोठी समस्या असते, पुढच्या गाडीच्या अप्पर हेडलाईटची..अप्पर हेडलाईटच्या प्रखर प्रकाशामुळे काही क्षण डोळ्यावर अंधारी येते. आणि अनेकवेळा तेच अपघाताच कारण ठरते. पुढचा रस्ता न दिसणे, डिव्हाईडर न दिसणे, गाडी रस्त्याच्या खाली उतरणे आणि अनेकदा पुढच्या गाडीचा अंदाज न आल्यानं गाडी दुस-या गाडीच्या खाली घुसते. हे सर्व होतं अप्पर हेडलाईटमुळे..china_police

जशी भारतात ही समस्या आहे तशीच चीनलाही ही समस्या भेडसावतेय. अशा धोकादायक वाहनचालकांना आवरायचं कसं, याच विचारातून चीनमधल्या शेन्झेन पोलिसांनी एक नामी शक्कल काढलीय. जे वाहनचालक हेडलाईट्स अप्पर ठेवून गाडी चालवतात, त्यांना तितक्याच प्रखर प्रकाशाकडे तब्बल एक मिनिट टक लावून बघण्याची शिक्षा दिली जातेय. त्यासाठी खास व्यवस्था पोलिसांनी केलीय.

पहिल्यांदा 2014 मध्ये सिनो विबो म्हणजेच चीनमधल्या ट्विटरसारख्या सोशल मीडियावरून अशा प्रकारच्या शिक्षेची घोषणा करण्यात आली होती. पण हे मानवाधिकारांचं उल्लंघन आहे, अशी ओरड झाल्यानं ती मोहीम तडकाफडकी थांबवण्यात आली. पण आता शेन्झेन पोलिसांनी ही मोहीम पुन्हा सुरू केलीय. प्रखर प्रकाशाच्या शिक्षेसोबतच अशा ड्रायव्हर्सना 300 युवानचा दंड ठोठावला जातो. तिथल्या सोशल मीडियावरून नेटकऱ्यांनी या मोहिमेला पाठिंबा दिलाय.

भारतात हा प्रश्न खूप गंभीर आहे..देशातल्या कोणत्याही रस्त्यावर जा..दुसऱ्यांची पर्वा न करता हेडलाईट अप्परवर ठेवून वाहन चालवणारे धोकादायक वाहचालक पावलोपावली भेटतात. आपल्या धुंदीत आपण दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालतोय याची त्यांनी तमा नसते. अशा नाठाळ वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी तशाच ठोस कारवाईची गरज आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close