पुण्यातील बिल्डर आणि नगरसेवकांना कोठडी

April 30, 2010 2:29 PM0 commentsViews: 6

30 एप्रिल

जमीन गैरव्यवहारप्रकरणी पुण्यात काल दोन बडे बिल्डर आणि दोन नगरसेवकांना सीआयडीने अटक केली. या चौघांना दोन मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

बाणेरमधील जमीन खरेदी प्रकरणी गैरव्यवहार केल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. पुण्याचे शिवसेनेचे माजी नगरसेवक अजय भोसले, पिंपरी-चिंचवडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राजेश पिल्ले अशी अटक झालेल्यांची नावे आहेत.

प्रदीप दोरगे यांनी या चार जणांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानंतर चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यापैकी अजय भोसलेंवर दोन दंगलींचे गुन्हे दाखल आहेत.

तर राजेश पिल्लेवर खंडणीचे दोन, खुनाचे दोन आणि एक जबरी चोरीचा गुन्हा आधीच दाखल आहे.

दरम्यान पिल्ले याची पक्षातून हकालपट्टी करण्याचे संकेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज पुण्यात दिले. जे चूक करतील त्यांची गय केली जाणार नाही, असे ते यावेळी म्हणाले.

पवार जरी असे म्हणाले असले तरी, त्यांच्याच ताब्यात असणार्‍या पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये तब्बल 45 नगरसेवक हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यापैकी तब्बल 38 नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत.

त्यामुळे अजित पवार यांनी घोषणा केली तरी खरेच कारवाई होणार, असा सवाल नागरिक करत आहेत.

close