अमेरिकेत ट्रम्प सरकार; हिलरींचा पराभव

November 9, 2016 2:10 PM0 commentsViews:

CwzdOjSVIAA7sm4

09 नोव्हेंबर:अमेरिकेच्या जनतेने राष्ट्राध्यक्षपदासाठी डॉनल्ड ट्रम्प यांच्या बाजूने कौल दिलाय. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना मागे टाकत ट्रम्प यांनी 289 इलेक्ट्रोरल मतं मिळवली. हिलरी क्लिंटन यांना 218 इलेक्टोरल मतं मिळाली. त्यामुळे ट्रम्प यांचा दणदणीत विजय झालाय. डॉनल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष झालेत.

ओहायो, फ्लोरिडा आणि नॉर्थ कॅरोलिना या महत्त्वाच्या राज्यांत झालेला विजय ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदापर्यंत घेऊन गेलाय. या राज्यांमधल्या मतदारांनी आणि इलेक्टर्सनी ट्रम्प यांच्या बाजूने कौल दिला.

राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या हिलरी क्लिंटन आणि निवडणुकीच्या राजकारणात तसे नवखे असलेले डॉनल्ड ट्रम्प यांच्यात ही लढत होती आणि ट्रम्प यांनी केलेल्या सनसनाटी प्रचारमोहिमेच्या जोरावर त्यांचा विजय झाला. विजयी झाल्यानंतर केलेल्या भाषणात ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांची प्रशंसा केली. हिलरींनी अमेरिकेची जी सेवा केलीय त्याबद्दल आपण त्यांचे ऋणी आहोत, असं ट्रम्प म्हणाले. अमेरिकेतल्या सगळ्या नागरिकांनी एकी दाखवावी, असं आवाहनही त्यांनी केलं.

इतके दिवस सनसनाटी प्रचार करणारे नाठाळ आणि वाचाळ डॉनल्ड ट्रम्प आता मात्र वेगळ्या भाषेत बोलतायत. खरंतर ट्रम्प हे अमेरिकन परंपरेतले राजकारणी नाहीत. न्यूयॉर्कचे उद्योगपती, टेलिव्हिजन प्रोड्युसर अशी त्यांची ओळख. एक बांधकाम व्यावसायिक म्हणून त्यांनी जगभरामध्ये टॉवर्स, हॉटेल्स, कॅसिनो, गोल्फ कोर्स उभारलेत. न्यूयॉर्कमध्ये त्यांच्या नावाने 75 मजल्यांचा ट्रम्प टॉवर आहे.

जून 2015 मध्ये ट्रम्प यांनी रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारी जाहीर केली आणि आपल्याच पक्षातल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना मागे टाकत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यापर्यंत मजल मारली. अमेरिकेत होणाऱ्या स्थलांतराचा प्रश्न लावून धरत त्यांनी अमेरिकन जनतेच्या अस्मितेलाच आवाहन केलं. ट्रम्प यांनी मुस्लीमविरोधी विखारी प्रचार केला.

हिलरी क्लिंटन यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव आणि एक महिला म्हणून त्या करत असलेला संघर्ष या गोष्टी हिलरींच्या बाजूने होत्या. पण मतदानाच्या आधीच्या आठवड्यात हिलरींचं ई मेल प्रकरण त्यांच्या मानगुटीवर पुन्हा बसलं आणि ट्रम्प यांना त्याचा चांगलाच फायदा झाला.

निवडणुकीआधी झालेल्या जनमत चाचण्यांमध्ये हिलरी क्लिंटन आघाडीवर होत्या. तरीही अमेरिकेच्या निष्णात राजकीय तज्ज्ञांनी ट्रम्प हेच निवडून येतील, असं भाकित केलं होतं आणि ते खरं ठरलं. अमेरिकेसारख्या महासत्तेच्या या निकालाचे अमेरिकेवरच नाही तर जगावर मोठे परिणाम होणार आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close