टोलनाक्यांवर सुट्ट्यांचा गोंधळ, महामार्गावर वाहतूक कोंडी

November 9, 2016 1:59 PM0 commentsViews:

toll problem

09 नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा आणि भ्रष्टाचारावर लगाम लावण्यासाठी पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द केल्याचं काल (मंगळवारी) रात्री  जाहीर केले होते. मोदी सरकारच्या या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केलं असलं तरी सर्वसामान्यांचे मात्र यामुळे चांगलेच हाल झाले आहेत. काळा पैशांविरोधातील या सर्जिकल स्ट्राईकने राज्यातील महामार्गांवर भीषण वाहतूक कोंडी झाली आहे. टोलनाक्यावर पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जात नसल्याने महामार्गांवर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

पंतप्रधानांनी काल घेतलेल्या एतिहासिक निर्णयामुळे आज (बुधवारी) सकाळपासून दैनंदिन कामकाजात अडथळे येऊ लागले आहेत. वांद्रे-वरळी सी लिंकवर टोलनाक्यावरील कर्मचा-यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला. यामुळे अवघ्या काही काळात सी लिंकवर भीषण वाहतूक कोंडी झाली. अखेरीस आणखी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी कर्मचा-यांनी पाचशे आणि हजारच्या नोटी स्वीकारायला सुरुवात केली आहे.

तर दुसरीकडे मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवरही वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. टोलनाक्यांवर 500 आणि 1000 रूपयांच्या नोटा स्विकारायला टोल कंपनीने नकार दिल्यामुळे एकच हलकल्लोळ माजला आहे. त्यामुळे मुंबईतील वाशी आणि एक्सप्रेस हायवेवरील खालापूर-उर्से या टोलनाक्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पहायला मिळतंय. दोन्ही टोलनाक्यांवर एक किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. एवढचं नाही तर टोल नाक्यांवरील कर्मचारी सुट्टे पैसे देण्यासही काचकूच करत असल्यामुळे वादावादीचे प्रसंगही घडतायत. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात सुट्टे पैसे नसल्याने टोल कर्माचर्‍यांचाही पुरता खोळंबा झालाय. त्यामुळे एकूणच टोलनाक्यांवरील ही परिस्थिती हाताबाहेर जाईल की काय असं चित्र निर्माण झालंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close