राज्याचा सुवर्णमहोत्सव झोकात

May 1, 2010 10:36 AM0 commentsViews: 4

1 मे

महाराष्ट्र राज्याचा सुवर्णमहोत्सव मोठ्या झोकात सुरू झाला आहे. आज सकाळीच मुंबईतील हुतात्मा चौकात संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा देणार्‍या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी हजेरी लावली. राज्यपाल शंकरनारायणनही यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकस्थळी वृक्षारोपणही करण्यात आले. कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, मुंबईच्या महापौर श्रध्दा जाधव उपस्थित होत्या.

हुतात्मा स्मारकाला वंदन करून काही आज तरुण रायगडावरही ज्योत घेऊन जाणार आहेत.

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने शिवाजी पार्कवर राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी ध्वजारोहण केले. यावेळी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. यावेळी पोलीस परेडचेही आयोजन करण्यात आले.

शिवाजी पार्कवर प्रदर्शन

महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवानिमित्ताने दादरच्या शिवाजी पार्कवर एक प्रदर्शन भरवण्यात आले आहे. यात राज्याच्या वेगवेगळ्या महामंडळांनी आत्तापर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेतला गेलाय.

राज्यपाल के. शंकर नारायणन यांनी या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

इथे ठेवलेल्या खादी आणि हस्तकला महामंडळांच्या वस्तूंची पहिल्या तासाभरातच 50 हजार रूपयांची विक्री झाली. राज्यातील विविध भागातील खाद्यसंस्कृती दाखवणारे स्टॉल्स, पुस्तक प्रकाशनांचे स्टॉल्स इथे लावले गेलेत.

एसटी महामंडळाने आपल्या आधुनिकीकरणाचा संदेश देणारा स्टॉलही इथे लावला आहे.

close