अबब, पुण्यात कचरा कुंडीत हजाराच्या 52 नोटा सापडल्या

November 10, 2016 5:08 PM0 commentsViews:

 pune_money

पुणे, 10 नोव्हेंबर : ‘पुणे तिथे काय उणे’ असं म्हटलं जातं ते उगाच नाही. 500 आणि 1000 च्या नोटा वापरातून रद्द झाल्यामुळे काळ्या पैशावाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले. अशाच एका पुणेकराने आपल्याकडील 1000 च्या 52 नोटा म्हणजे 52 हजार रुपये चक्क कचरा कुंडीत फेकले. पण दुसरीकडे दोन प्रामाणिक पुणेकरांनी हे पैसे पोलिसांकडे सुपूर्द केले.

500 आणि 1000 च्या नोटा वापरातून रद्द झाल्यामुळे घरात साठवून ठेवलेले पैसे लोकांना बँकेत भरण्याची नामुष्की आलीये. विशेष म्हणजे उत्पन्नाच्या अतिरिक्त पैसा आढळला तर इन्कम टॅक्सकडून कारवाईही होणार आहे. त्यामुळे दुहेरी अडचणीत सापडलेल्या काळा पैशावाल्यांना ‘इकडे आड तिकडे विहीर’अशी परिस्थिती निर्माण झालीये. पुण्यातही अशीच एक घटना घडलीये. कुणीतरी आपल्याकडील 52 हजार रुपये चक्क कचरा कुंडीत फेकून दिले. विशेष म्हणजे या सर्व 1000 च्या 52 नोटा होत्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास महापालिकेचे मुकादम खंडू कसबे आणि सफाई महिला कर्मचारी शांताबाई ओव्हाळ यांना डेक्कन पोलीस स्टेशनच्या हद्दीत कांचन गल्ली येथील कचरा कुंडीतमध्ये 1 हजाराच्या 52 नोटा सापडल्यात. अचानकपणे सापडलेल्या या पैशांमुळे दोघेही गोंधळून गेले पण दुसऱ्याच क्षणी दोघांनीही ही रक्कम सापडल्याचं डेक्कन पोलिसांना कळवलं. पोलिसांनी हे पैसे ताब्यात घेतले असून पुढील तपास करत आहे. पण, या निमित्ताने काळा पैशावाल्याची कचऱ्याची अवस्था झालीये आणि गरिबाचा प्रामाणिकपणा मोठा ठरलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close