नव्या नोटेची नवलाई अन् जुन्या नोटांचं रडगाणं !

November 10, 2016 10:10 PM0 commentsViews:

10 नोव्हेंबर : 500, हजाराच्या नोट बंदीनंतर आज बँका उघडल्या खऱ्या. पण, पुरेशा चलनाअभावी दैनंदिन व्यवहार अजूनही सुरळीत होऊ शकलेले नाहीत. अनेकांचा आजचा संपूर्ण दिवस हा तर बँकांमध्येच पैसे बदलून घेण्यात वाया गेला. सलग दुसऱ्या दिवशी एटीएम बंद असल्यानं लोकांची खूपच गैरसोय झाली.2000_note_23

दोन दिवसांच्या बँक बंदीनंतर गुरूवारचा दिवसच मुळी उजाडला तो या अशा लांबच लांब रांगांनी…राजधानी दिल्लीत तर लोकांनी थेट रिझर्व्ह बँकेसमोरच रांग लावली होती. इकडे मुंबईत तर जागेअभावी इमारतींच्या जिन्यांमध्येही लोकांनी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या.या सगळ्या रांगा अर्थातच 500 आणि हजाराच्या नोटा बदलून घेण्यासाठी होत्या. पण काही ठिकाणी बँकांमधले पैसेच संपल्याने अनेकांना आल्या पावली परत फिरावं लागलं.

मुंबई प्रमाणेच, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, रत्नागिरी अशा सगळ्याच लहानमोठ्या शहरांमध्ये लोकांनी जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांसमोर रांगा लावल्या होत्या.त्यातल्या काहींना 2000च्या नव्या नोटाही लगेच हाती पडल्या देखील. नवी करकरीत नोट हातात पडल्यानंतरचा आनंद लोकांच्या चेह-यांवर काही औरच होता.

तिकडे रत्नागिरीमध्ये तर लोकं सकाळी आठपासूनच बँकांसमोर रांगा लावून उभे होते. पण बँका उघडल्या आपल्या नेहमीच्या वेळेला म्हणजेच दहा-साडेदहा वाजता…अशातच व्यापा•यांना वशिल्याने आत सोडलं जात असल्याने रांगांमध्ये उभा राहून त्रासलेल्या ग्राहकांचा संताप अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.

रेल्वेस्टेशन्स, बसस्थानकं, पेट्रोलपंप, हॉस्पिटल्स अशा ठिकाणी जुन्या नोटा स्वीकारण्याचे स्पष्ट आदेश असूनही ग्राहकांना कर्मचा-यांचा आडमुठेपणा बघायला मिळत होता. दरम्यान, काही जणांनी जुन्या नोटा खपवण्यासाठी चक्क दीड लाखांची रेल्वे तिकीटं बुक केल्याची धक्कादायक बाब समोर आलीय.तर पुण्यात चक्क 52 हजारांची रोकड चक्क कचराकुंडीत टाकून दिल्याचं आढळून आलं. नंतर एका महिलेने हीच बेवारस कॅश पोलीस ठाण्यात जमा केली.काळा पैसा खपवण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंत असे अनेक भन्नाट फंडे बघायला मिळतील. थोडक्यात कायतर बँक बंदी उठल्यानंतरचा पहिला दिवस एकूण गोंधळाचाच होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close