राजधानीत महाराष्ट्राचा गौरव

May 1, 2010 1:47 PM0 commentsViews: 4

1 मे

देशाची राजधानी दिल्लीतही आज महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यानिमित्ताने महाराष्ट्राचे नाव देशात उज्ज्वल करणार्‍या क्रिडापटू, शास्त्रज्ञ, कलाकार आणि साहित्यिकांचा राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

उद्योग क्षेत्रातील योगदानाबद्दल अतुल किर्लोस्कर, साहित्य क्षेत्राबद्दल पद्मश्री मधू मंगेश कर्णिक, माजी एअर चीफ मार्शल अनिल टिपणीस, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, एअर चीफ मार्शल पी. जी. नाईक, चित्रपट, नाट्य क्षेत्रातील योगदानाबद्दल नाना पाटेकर, तसेच ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांचा राष्ट्रपतींनी सत्कार केला.

यावेळी व्यासपीठावर कृषीमंत्री शरद पवार, अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख, उर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रपतींनी सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा उल्लेख केला.

भक्ती शक्ती आणि संस्कृतीचे अधिष्ठान महाराष्ट्राला मिळाले आहे. वारकरी वारकरी सांप्रदायाने कर्मकांडात अडकलेल्या तसेच अठरा पगड जातींना भक्तीचा सुलभ मार्ग दाखवून एकत्र आणले. महाराष्ट्रात आजही अध्यात्मिक लोकशाही जपली जात आहे.

छत्रपती शिवरायांसोबतच 1857च्या आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महाराष्ट्राच्या वीरांनी योगदान दिले, भारतीय स्वातंत्र्यालढ्याचे नेतृत्व केले. फुले, शाहू आंबेडकरांनी देशात सामाजिक सुधारणेचा पाया घातला.

महाराष्ट्राने विविध क्षेत्रात चौफेर प्रगती केली आहे. पण शेतीसाठी पाणी, विविध पायाभूत सुविधा, शहरीकरणाचे नियोजन, झोपडपट्टी निर्मूलन, वीजेच्या प्रश्नाची सोडवणूक, प्रचलित शिक्षण पद्धतीत सुधारणा, तसेच दहशतवादाचा बिमोड अशा अनेक समस्या राज्यापुढे आहेत. भविष्यात त्यांची सोडवणूक करणे गरजेचे आहे.

तेजस्वी अस्मिता आणि ओजस्वी इतिहास जपत महाराष्ट्राने आकांक्षापुढती गगन ठेंगणे व्हावे, एवढी प्रगती करावी, अशी अपेक्षा राष्ट्रपतींनी व्यक्त केली.

close