नोटबंदीचा निर्णय घातकी, उद्धव ठाकरेंचं मोदींवर टीकास्त्र

November 11, 2016 4:56 PM1 commentViews:

uddhav on modi_land_bill11 नोव्हेंबर : काळा पैसा थांबलाच पाहिजे पण त्यासाठी मोदींनी वापरलेली पद्धत ही चुकीची आहे. कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता अचानक नोटा बंदीचा निर्णय घेऊन मोदींनी सर्वसामान्यांची फसवणूक केलीये. आता तुम्ही लोकांच्या लॉकर्सवरही नजर ठेवणार आहात का ?, नोटा बंद करायच्या होत्या तर नवीन नोटा का आणता ? असा संतप्त सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारलाय. तसंच देशाला वा-यावर सोडून पंतप्रधान परदेशवारीसाठी गेले, त्यांचा निर्णय घातकी आहे अशी सडकून टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी 500 आणि 1000 च्या नोटा रद्द झाल्याची घोषणा केली. अचानकपणे घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांची त्रेधातिरपिट उडाली. बँकात गर्दी आणि एटीएम बंद असल्यामुळे लोकांना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतंय. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपल्याच मित्रपक्षाला चांगलंच धारेवर धरलं.

नोटा बंदीवरून उद्धव ठाकरेंनी मोदींवर सडकून टीका केलीये. देशाला वा-यावर सोडून पंतप्रधान परदेशवारीसाठी गेल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केलीय. नोट बंदीचा निर्णय घेण्याच्या अगोदर पर्यायी व्यवस्था करायला पाहिजे होती. अचानक घेतलेल्या निर्णयामुळे लोकांचा छळ होतोय. आता जनसामान्यांच्या उद्रेकाचा सर्जिकल स्ट्राईक झाला तर याला जबाबदार कोण ? असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारलाय.

ज्या लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला अधिकार दिले त्यांचाच तुम्ही आज छळ करत आहात. लोकांना आधी याची कल्पना देऊन वेळा द्यायला हवा होता. काळा पैशावाल्यावर नजर ठेवण्याऐवजी तुम्ही आता सर्वसामान्यांच्या लॉकर्सवरही नजर ठेवणार का ? बँकेत पैसे भरताना आधारकार्ड वापरायचे सांगताय त्याऐवजी मोदींचा फोटो वापरायला हवा होता असा टोलाही उद्धव यांनी लगावला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Sanjay D Paul

    मा. उद्धव ठाकरे ….
    सामान्य माणसाना आनंद झालाय……त्रास होतोय तो काळा बाजारवाल्यांना …!!
    थोडा त्रास होईल ….पण व्यवस्था खास होईल ..!!

close