तुम्हाला त्रास होईल पण काळा पैशावाल्यांना सोडणार नाही -मोदी

November 12, 2016 3:16 PM0 commentsViews:

narendra_modi_speech12 नोव्हेंबर : 500 आणि 1000 च्या नोटबंदीवर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडलं. जपान दौ-यावर असताना कोबामध्ये भारतीय समुदायाला संबोधित करताना, “तुम्हाला आता थोडा त्रास होईल पण काळा पैशावाल्यांना सोडणार नाही” असं पंतप्रधानांनी ठणकावून सांगितलं. तसंच त्यांनी विरोधकांचाही खरपूस समाचार घेतला.

नरेंद्र मोदींनी लोकांना होणा-या त्रासाबद्दल भाष्य केलं. आठ तारखेपासून 500 आणि 1000 च्या नोट चलनातून रद्द करण्यात आल्यात. मी सव्वाशे कोटी भारतीयांना सलाम करतो. कुणाच्या घरात लग्न आहे, कुणी आजारी आहे, लोकांना अडचणींना सामोरं जावं लागतंय अशा परिस्थिती लोकांना मोदींच्या विरोधात बोलण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. पण लोकांनी त्याला विरोध करून नोटबंदीच्या निर्णयाचं स्वागत केलंय जसं 2011 मध्ये जपानमधील लोकांनी स्विकारलं होतं. 5-5 तास रांगेत लोकं उभं राहत आहे. पण, पाप करणारे जास्त आहे. खरंतर 5 लाख, 10 लाख आणि 125 कोटींची खरी अडचण आहे असं मोदी म्हणाले.

पूर्वी गंगेत कुणी चारआणे टाकत नव्हतं आता हजाराच्या नोटा टाकत आहे. मला लोकांचा इतका आशिर्वाद मिळेल याचा विचार केला नव्हता असा टोलाही मोदींनी विरोधकांना लगावला. अनेक महिलांनी घरात पैसा जपून ठेवलाय. तो इमानदारीचा पैसा आहे. त्यामुळेच महिलांनी बँकेत जरी पैसे भरले तरी अडीच लाखांपर्यंत कोणताही टॅक्स लागणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मी आधीच स्पष्ट केलं होतं. तुम्हाला थोडा त्रास होईल. पण जी लोकं काही गडबड करतील त्यांना आम्ही सोडणार नाही, त्यासाठी काही करावे लागले तरी करणार पण एकाही काळापैशावाल्याला सोडणार नाही. इमानदार लोकांच्या पाठिशी सरकार आहे. त्यांच्यासाठी माझं सरकार काहीही करेल. पण काळा पैशावाल्याचा हिशेब चुकता करावा लागणार आहे. स्वातंत्र्याकाळापासून आतापर्यंतचा सर्व हिशेब तुम्हाला द्यावा लागणार आहे. मी याचीही गॅरंटी देत नाही की 30 डिसेंबरनंतर काळापैशावाल्यांवर कोणतीही कारवाई करणार नाही असा इशाराही मोदींनी दिला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा