काळ्या पैशांविरोधातील लढाईसाठी मला 50 दिवसांची मुदत द्या – पंतप्रधान

November 13, 2016 3:29 PM0 commentsViews:

narendra_modi_speech

13 नोव्हेंबर :   भ्रष्टाचार ही देशातील मोठी समस्या आहे. गेल्या 70 वर्षांपासूनचा हा भ्रष्टाचाराचा रोग मला 17 महिन्यांत संपवायचा आहे. सरकारच्या कठोर निर्णयामुळे देशातील सामान्य जनतेला त्रास होतोय याची मला कल्पना आहे. पण अजून जनतेला फक्त 50 दिवस थोडाफार त्रास सहन करावा लागेल, त्यानंतर सर्वकाही सुरळीत होईल,’ असं आवाहन मोदींनी केलं.

गोवामधल्या ग्रीनफिल्ड विमानतळाच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमात मोदी बोलत होते. यावेळी बोलताना ‘सरकारकडून जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत. भ्रष्टाचार नष्ट करण्याची जबाबदारी सरकारवर आहे. नोटबंदीमुळे होणाऱ्या त्रासाची मला कल्पना आहे. थोड्या दिवसांनतर सर्व काही सुरळीत होईल. नोटबंदीला अर्ध्यापेक्षा जास्त नेत्यांचा विरोध होता. सोनंखरेदीसाठी पॅनकार्ड आवश्यक नको, अशी विनंतीही अनेक खासदारांनी केली असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

नोटा बदलीच्या निर्णयावर बोलताना मोदी यावेळी भावूक झाले होते. ‘मी देशासाठी घर आणि कुटुंब सोडले आहे. मी खुर्चीसाठी जन्माला आलेले नाही. त्यामुळे खुर्चीसाठी देश चालवणार नाही,’ असं मोदींनी म्हटलं आहे. पण सत्ता टिकावी म्हणून भ्रष्टाचाराशी तडजोड करणार नाही, असं प्रतिपादनही मोदींनी केलं. त्याचबरोबर, लवकरच बेहिशेबी संपत्तीवर हल्लाबोल करु,’ असं आश्वासनही मोदींनी दिलं आहे.

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर विरोधकांनी टीका केली होती. यावरुन मोदींनी विरोधकांवरही हल्ला चढवला. ‘ज्यांना राजकारण करायचे आहे, त्यांनी बिनधास्त राजकारण करावे. काळा पैसा असणाऱ्या लोकांकडूनच मिठाचा तुटवडा असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत,’ अशी टीका मोदींनी केली. ‘घोटाळेबाज सध्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकेसमोरील रांगेत उभे आहेत,’ असं म्हणत मोदींनी बँकेसमोरील रांगेत उभ्या राहणाऱ्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

‘लोकांनी काळ्या पैशाविरोधातील कारवाई करण्यासाठी मला मतदान केले होते. त्यामुळे काळ्या पैशांविरोधातील लढाई तीव्र करण्यात येईल,’ असेही मोदींनी म्हटलं आहे. यावेळी मोदींनी भ्रष्टाचाऱ्यांविरोधात लढाई सुरू करून धोका पत्करला असल्याचंही त्यांनी सांगितलं. ‘मला माहीत आहे की भ्रष्टाचाऱ्यांविरोधात लढा सुरू करून मी कुणाशी वैर घेतलं आहे. आता कोण कोण माझ्या विरोधात जाणार हेही मला माहीत आहे. कदाचीत ते मला संपवण्याचाही प्रयत्न करतील. त्यांना हवं ते करू द्या, पण  पुढचे 50 दिवस मला तुमची साथ हवी आहे.’ असंही मोदींनी म्हणाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा