बँका बंद, एटीएममध्ये खडखडाट ; लोकं हवालदिल

November 14, 2016 3:29 PM0 commentsViews:

atm_no_cash14 नोव्हेंबर : आज गुरूनानक जयंती निमित्त बँक हॉलिडे असल्याने सर्वच बँका बंद आहेत. त्यात भरीस भर म्हणून एटीएम केंद्रही बंद आहेत. मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि नागपूर अशी बहुतांश ठिकाणची एटीएम केंद्र बंद आहेत. तर चालू असलेली केंद्रही एव्हाना ‘आऊट ऑफ कॅश’ झालीत. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी पैसे काढण्यासाठी घराबाहेर पडलेल्या लोकांना हात हालवतच परत यावं लागलंय.

500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्यानंतर देशभरात बँकांमध्ये लोकांची झुंबड उडाली आहे. घरात जपून ठेवलेले पैसे बँकेत जमा करण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलीये. एकाच वेळी पैशांचा तुटवडा झाल्यामुळे एटीएममध्ये खडखडाट पाहण्यास मिळाला. तो अजूनही कायम आहे. देशभरातील अनेक एटीएम अजूनही बंदच आहे. आज बँकाही बंद असल्यामुळे लोकांची मदार एटीएमवरच आहे. आधीच पैशांची चणचण त्यात 2000 रुपये काढण्यासाठी एटीएमही बंद अशात लोकांच्या गैरसोयीत भरच पडलीये.

दरम्यान, जुन्या नोटा स्वीकारण्याच्या मुदतीत 10 दिवसांची वाढ करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतलाय. यामुळे रेल्वे, सरकारी कार्यालयं, सार्वजनिक रूग्णालयं अशा सर्वच ठिकाणी अजून 10 दिवस या नोटा घेतल्या जातील. 500 आणि 1000 च्या नोटा बंद केल्यानंतर त्या बदलण्यासाठी ग्राहकांची बँक आणि पोस्ट ऑफिसवर झुंबड उडाल्याचं चित्र पहायला मिळतंय. ही परिस्थिती पाहता ही मुदत येत्या 24 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आलीय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close