तुम्ही चारआण्याच्या पुढे जाऊ शकले नाही, मोदींचा काँग्रेसला टोला

November 14, 2016 3:47 PM0 commentsViews:

modi_on_congress14 नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज उत्तर प्रदेशातल्या गाझीपूरमध्ये काँग्रेस आणि विरोधी पक्षावर जोरदार हल्ला चढवला. काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आलाय. पण विरोधकांनी सरकारचा हा निर्णय गरिबांच्या विरुद्ध आहे, अशी टीका केलीय. तुम्ही चारआणे बंद केले पण चारआण्यापेक्षा पुढे जाऊ शकले नाही. आम्ही आमच्या क्षमतेनुसार निर्णय घेतला असा टोलाही मोदींनी काँग्रेसला लगावला.

उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी प्रचार करतानाच त्यांनी काळ्या पैशाविरुद्ध देशात कशी कारवाई केली जातेय ते सांगितलं. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातल्या मतदारांनी पूर्ण बहुमताचं सरकार निवडून देण्यात योगदान दिलं. म्हणूनच आता काळा पैसा बाळगणारे आणि भ्रष्टाचार करणा-यांची झोप उडाली आहे. काळा पैसा बाळगणारे लोक झोपेच्या गोळ्या घेत आहे तर गरीब लोक निवांत झोपी जात आहे असंही मोदींनी सांगितलं.

तसंच पंडित नेहरूंचे कुटुंबीय आणि काँग्रेस नेते माझ्यावर टीका करतात पण पं.नेहरूंच्या काळापासून अपुरी राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करतोय, असं मोदी म्हणाले. आजच्या नेहरू जयंतीची आठवणही त्यांनी करून दिली.

केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाला तुम्ही पाठिंबा देता का ?, असं मोदींनी सभेला आलेल्या लोकांना वारंवार विचारलं. उत्तर प्रदेशातल्या जनतेनेही त्यांना प्रतिसाद दिला. यावरून देशातली गरीब जनता केंद्र सरकारच्या निर्णयाला पाठिंबा देतेय हे स्पष्ट झालं, असंही मोदी म्हणाले. देशाच्या नागरिकांच्या हितासाठीच सध्या चलनात असलेल्या 500 आणि 1 हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला, असं त्यांनी सांगितलं. काळा पैसा बाळगणा-यांवर छापे मारायचे तर त्यासाठी कितीतरी वर्षं
लागली असती, त्यामुळे हा पर्याय आम्ही स्वीकारला, असं मोदी म्हणाले.

गंगा नदीत 500 आणि हजाराच्या नोटा टाकल्या जात आहे. पण त्यामुळे तुमचे पाप धुतले जाणार नाही. मला माहित आहे माझ्याविरोधात खूप शक्तिशाली ताकद काम करत आहे पण मला तुमचा साथ हवीये, तुमचा आशिर्वाद हवाय याबळावरच मी ही लढाई लढतोय अशी भावनिक सादही मोदींनी घातली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close