अखेर संप मागे

May 4, 2010 11:29 AM0 commentsViews: 1

4 मे

मागण्यांबाबत मध्यस्थी करण्याचे राज्यसरकारने दिलेल्या आश्वासनानंतर अखेर मुंबईतील मोटरमन्सनी संप मागे घेतला आहे.

त्यामुळे काही काळातच लोकल सेवा पूर्ववत होऊन मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर संप मागे घेण्यात आल्याची माहिती आर. आर. यांनी दिली.

मोटरमन्सच्या सर्व मागण्या राज्य सरकार रेल्वे ऍथॉरिटीकडे पोहोचवेल. मोटरमन्सवरील सर्व केसेस मागे घेतल्या जातील, कोणत्याही रेल्वे कर्मचार्‍यांवर सूडबुद्धीने कारवाई होणार नाही, असे आश्वासन आर. आर. पाटील यांनी मोटरमन युनियनला दिले.

केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रेल्वे मंत्र्यांसोबत या मुद्द्यावर चर्चा केली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

यानंतर आता मोटरमन कामावर रुजू होणार आहेत. आणि लोकलसेवा सुरळीत होऊन मुंबई पुन्हा धावू लागणार आहे.

कालपासून सुरू असलेल्या या संपामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. आज खुद्द मंत्रालयात केवळ 18 टक्के तर खाजगी आस्थापनांमध्ये केवळ 30 टक्केच कर्मचार्‍यांनी हजेरी लावल्याचे आर. आर. यांनी सांगितले.

लोकांची गैरसोय लक्षात घेऊन राज्यसरकारनेच पुढाकार घेऊन मोटरमन संपात मध्यस्थी केल्याचे आर. आर. यांनी सांगितले.

तर याबाबत केंद्राकडे 15 जूनपर्यंत अहवाल सादर केला जाईल. लोकांना वेठीस न धरण्याची आमची विनंती मोटरमन युनियनने मान्य केल्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

मोटरमनच्या मागण्यांचा विचार करण्यासाठी एक समिती नेमण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. आता राज्यसरकार मोटरमनवर दाखल केलेले फौजदारी खटले मागे घेणार आहे.

निलंबित केलेल्या 20 मोटरमनचे निलंबन रद्द करण्यात आले आहे. मोटरमनचे न्याय्य प्रश्न सोडवण्यासाठी मध्यस्थी करणार असल्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे.

close