नोटबंदीवरून संसदेत वादळ

November 17, 2016 5:36 PM0 commentsViews:

rajasabha3434 17 नोव्हेंबर : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या कामकाजाला अपेक्षेप्रमाणे वादळी सुरुवात झाली. या गोंधळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज तहकूब करावं लागलं. नोटबंदीचा निर्णय घेण्याआधी सरकारने पुरेशी तयारी केली नाही, असा सगळ्या विरोधी पक्षांचा आक्षेप आहे. पण हा निर्णय देशाच्या हितासाठी घेण्यात आलाय, असं सरकारने म्हटलंय. जे या निर्णयाला विरोध करतायत त्यांची काळा पैसा आणि भ्रष्टाचाराबद्दल काय भूमिका आहे, असाही प्रश्न सरकारने विचारलाय.

संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरू झाल्यावर प्रचंड गोंधळ सुरू झाला. सरकारविरुद्ध आज सगळे विरोधक एकवटले होते. नोटाबंदीच्या मुद्द्यावर केंद्र सरकारला कोंडीत पकडण्यासाठी सगळे विरोधी पक्ष तयारीतच होते. दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांनी प्रचंड घोषणाबाजी केली. राज्यसभेत विरोधी पक्षाचे खासदार हौदात उतरले होते.

लोकसभेत गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नोटाबंदीच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी केली. यासाठी स्थगन प्रस्ताव स्वीकारण्याची मागणी करण्यात आली. प्रश्नोत्तराचा तास रद्द करत नोटबंदीवर चर्चा व्हावी, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. राज्यसभेत प्रचंड गोंधळामुळे कामकाज चार वेळा तहकूब करावं लागलं. तर लोकसभेचं कामकाज आजच्या दिवसासाठी तहकूब झालंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close