विजय माल्या यांचं कर्ज माफ नाही -अरुण जेटली

November 17, 2016 8:20 PM0 commentsViews:

 arun jaithley17 नोव्हेंबर : केंद्र सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयानंतर किंगफिशर एअरलाइन्सचे विजय माल्या यांच्या कर्जाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. स्टेट बँक ऑफ इंडियाने विजय माल्या यांचं कर्ज राईट ऑफ म्हणजे निर्लेखित केलं आहे. पण कर्ज निर्लेखित करणं म्हणजे कर्ज माफ करणं नाही, असं स्पष्टीकरण काल केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिलं. बँकांनी दिलेलं कर्ज वसूल करण्याचा बँकांचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी ही यादी तयार करण्यात आलीय, असं अरुण जेटली म्हणाले.

राज्यसभेमध्ये काल काँग्रेसचे खासदार आनंद शर्मा यांनी विजय माल्या यांच्या कर्जाचा मुद्दा उपस्थित केला. स्टेट बँक ऑफ इंडियामार्फत कर्जदारांना सुमारे 7 हजार कोटींचं कर्ज माफ करण्यात आलंय आणि त्यात विजय माल्या यांच्या किंगफिशर एअरलाइन्सला झुकतं माप देण्यात येतंय, असा आरोप त्यांनी केला. माल्या यांच्या कर्जावरून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि सीपीएमचे सीताराम येचुरी यांच्यातही खडाजंगी झाली. त्यात विजय माल्या यांच्या कर्जवसुलीसाठी पाठपुरावा सुरूच राहील, असं आश्‍वासन अरुण जेटली यांनी दिलंय.

विजय माल्या यांना यूपीए सरकारच्या काळात कर्ज देण्यात आलं होतं. काँग्रेस सरकारच्या काळातच या कर्जाची पुनर्रचना झाली, असंही जेटली म्हणाले.स्टेट बँक ऑफ इंडियाने जी कर्ज निर्लेखित केलीयत त्यात विजय माल्या यांच्या किंगफिशर एअरलाइन्सला दिलेल्या 1200 कोटी रुपयांचा समावेश आहे. विजय माल्या यांना स्टेट बँक ऑफ इंडियाच नव्हे तर 17 बँकांनी सुमारे 9 हजार कोटींचं कर्ज दिलंय. हे कर्ज विजय माल्या यांनी परत केलेलं नाही. विजय माल्या सध्या युकेमध्ये आहेत, असं बोललं जातं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close