नोटा बंदीचा आज 13वा दिवस, भल्या पहाटे राहुल गांधी एटीएमबाहेर

November 21, 2016 10:25 AM0 commentsViews:

rahul gandhi @ ATM

21 नोव्हेंबर :   नोटाबंदीच्या निर्णयावरुन एकीकडे सर्वसामान्य जनता काँग्रेसने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी पहाटे दिल्लीतील जनकपूरी आणि इंद्रपूरीमधील एटीएम केंद्राला भेट दिली. एटीएमबाहेर रांगेत उभे असलेल्या लोकांशी राहुल गांधींनी संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबररोजी पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द केल्याची घोषणा केली होती. यानंतर देशभरात चलनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. दिवसागणिक बदलणाऱ्या नियमावलीने गोंधळात भर पडली आहे.  13 दिवसानंतरही परिस्थितीत फारशी सुधारणा झाली नाही. या मुद्द्यावरुन आता विरोधकही आक्रमक झाले आहेत.

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी याच मुद्द्यावरून मोदी सरकारला  घेरण्यासाठी कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राहुल गांधी यांनी एटीएम केंद्राला भेट दिली आणि लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. संसदेतील रणनिती ठरवण्यासाठी काँग्रेसची सकाळी साडे दहा वाजता बैठक होणार आहे. लोकांच्या समस्या जाणून घेतल्यावर राहुल गांधी आता संसदेत काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, यापूर्वी राहुल गांधी यांनी दिल्लीतील बँकेत रांगेत उभे राहून पैसे बदलून घेतले होते. तर भिवंडीतील न्यायालयातून परतत असताना राहुल गांधी यांनी वाकोल्यातील एटीएम केंद्राबाहेरील लोकांशी संवाद साधला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close