नोटाबंदीवरून आजही खडाजंगी, दोन्ही सभागृहात विरोधक आक्रमक

November 21, 2016 1:14 PM0 commentsViews:

Cxw3NBZUcAAScmk
21 नोव्हेंबर : संसदेत हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातही नोटाबंदीच्या मुद्द्यावरी विरोधकांचा गोंधळ सुरूच आहे. सोमवारी संसदेच्या कामकाजाला सुरुवात होताच विरोधकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. बँकेच्या रांगांमध्ये मरण पावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहण्यात यावी, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. मात्र, विरोधक चर्चेतून पळ काढत आहेत, असा पलटवार अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी केला आहे.

संसदेचं कामकाज सुरू झाल्यानंतर सर्वात आधी पाटणा-इंदूर एक्स्प्रेस दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर लगेचच विरोधी पक्षांनी नोटाबंदीचा मुद्दा उचलत बँकांबाहेर लागणाऱ्या रांगांमधील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी केली आहे.  यादरम्यान सरकारविरोधात घोषणा देत विरोधक वेलमध्ये उतरले.

यावर फक्त टीव्हीमध्ये झळकण्यासाठी काही जण गोंधळ घालत असतात, असा आरोप खुद्द लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी केल्यानं लोकसभेत एकच गोंधळ घातला. तर सरकार चर्चेसाठी तयार आहे, पण विरोधक चर्चेऐवजी विविध कारण पुढे करुन चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप अरुण जेटली यांनी केला.

दरम्यान, या सगळ्या गोंधळामुळे अखेर राज्यसभेचे कामकाज आधी अर्ध्या तासासाठी आणि नंतर पुन्हा अर्ध्या तासासाठी स्थगित करण्यात आलं. लोकसभेतही विरोधकांच्या गोंधळामुळे कामकाजात अडथळे येत असून दुपारी २ वाजेपर्यंत लोकसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close