शरद पवारांचं वक्तव्य दुतोंडीपणाचंच म्हणावं लागेल – शिवसेना

November 22, 2016 11:44 AM0 commentsViews:

uddhav_thackery3

22 नोव्हेंबर : ‘देशात आर्थिक आणीबाणी आली आहे, असं शरद पवार यांचं वक्तव्य दुतोंडीपणाचंच म्हणावं लागेल. नरेंद्र मोदी बारामतीत त्यांच्या मांडीस मांडी लावून बसले होते. त्या व्यासपीठावरून पवारांनी हे शब्दबाण सोडले असते तर आम्हीही त्यांना ‘जाणते राजे’ मानायला मागेपुढे पाहिलं नसतं, पण बारामतीत चमचेगिरी करायची आणि मुंबईत बोटे मोडायची हे उद्योग लोकहिताचे नाहीत’, अशा शेलक्या शब्दांत शिवसेनेने आज (मंगळवारी) मोदी-पवार यांच्यातील मैत्रीवर टीकास्त्र सोडले आहे.

नोटाबंदीच्या निर्णयावरुन विरोधक आक्रमक झाले असताना मित्रपक्ष शिवसेनादेखील वारंवार या निर्णयाचा विरोध करत आहे.  शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मोदी-पवार यांच्यातील मैत्रीवर निशाणा साधला आहे. तसंच, सामान्यांना जन्मठेपेलाच का पाठवत नाही? असा सवाल विचारला आहे.

दुसर्‍याच्या खात्यावर पैसे टाकल्यास सात वर्षांची सजा हे ठीक आहे, पण आम्ही तर म्हणतो सात वर्षांची कशाला, ही सजा जन्मठेपेचीच करा. प्रश्‍न इतकाच की, त्यासाठी बळीचे बकरे फक्त सामान्यांनाच का करता? देशाची अर्थव्यवस्था मुठीत ठेवून राजकारणात पैशांचा महापूर आणणार्‍या किती बड्या धेंडांना आजपर्यंत सात वर्षे सोडाच, पण सात दिवसांची सजा ठोठावली गेली?, असा खरमरीत सवाल अग्रलेखात करण्यात आला आहे.

एवढचं नाही तर, एकही ‘बडा’ मासा नोटा बदलण्यासाठी रांगेत उभा नव्हता. याचा अर्थ इतकाच की, खरा काळा पैसा अद्यापि बाहेर पडलेलाच नाही आणि हे सत्य शेवटी ‘मोदी’ मित्रांना स्वीकारावे लागलेच, असा टोलाही उद्धव यांनी लगावला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close