पंतप्रधान टीव्ही-कॉन्सर्टमध्ये बोलतात, मग संसदेत का नाही?- राहुल गांधी

November 22, 2016 3:04 PM0 commentsViews:

rahul gandhi_4

22 नोव्हेंबर : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी नोटाबंदीच्या निर्णयावरून पंतप्रधान मोदींना पुन्हा लक्ष्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी टीव्हीवर बोलतात, पॉप कॉन्सर्टला बोलतात, मग ते संसदेत का बोलत नाहीत?, असा थेट सवाल राहुल गांधी यांनी मीडियाशी बोलताना उपस्थित केला.

दिल्लीत आज झालेल्या भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीत बोलताना मोदी भावूक झाले. नोटाबंदीच्या निर्णयाला काळ्या पैशांविरोधातील सर्जिकल स्ट्राइक म्हणू नका, असं आवाहनही मोदींनी यावेळी केलं. तर मोदींच्या भावूक होण्यावरूनही राहुल गांधींनी त्यांच्यावर निशाना साधला. नोटाबंदीच्या मुद्द्यावर आम्ही बोलल्यानंतर मोदी आणखी भावूक होतील, असं राहुल यांनी म्हटलं. यापूर्वी गोव्यातील जाहीर भाषणातही देशासाठी घरादाराचा त्याग केला, हे सांगतानाही मोदी भावनाविवश झाले होते, असा टोला ही त्यांनी लगावला आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी संसदेत येऊन नोटाबंदीच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधकांनी हा मुद्दा लावून धरल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज ठप्प होताना दिसत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close