प्रख्यात शास्त्रीय गायक बालमुरलीकृष्णन यांचं निधन

November 22, 2016 6:42 PM0 commentsViews:

 bal 1

 22नोव्हेंबर: प्रख्यात शास्त्रीय गायक बालमुरलीकृष्णन यांचं निधन झालंय. बालमुरलीकृष्णन हे कर्नाटक संगीतातले दिग्गज गायक होते. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. चेन्नईतल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. बालमुरलीकृष्णन यांचा जन्म आंध्र प्रदेशमधला. पण कर्नाटक संगीताला त्यांनी अमूल्य योगदान दिलं आहे. 1991 साली त्यांना पद्मविभूषण किताबाने सन्मानित करण्यात आलं होतं.

बालमुरलीकृष्णन यांनी पंडित भीमसेन जोशी यांच्यासोबत अनेक मैफली गाजवल्या. ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या गीतामध्येही त्यांचे सूर आपण ऐकले आहेत. बालमुरलीकृष्णन व्हायोलिनवादनातही निष्णात होते. त्यांच्या निधनामुळे कर्नाटकी संगीतातच नव्हे तर भारतीय संगीतक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

बालमुरलीकृष्णन यांनी वयाच्या सहाव्या वर्षी गायनाला सुरुवात केली. 15 व्या वर्षीच त्यांनी अनेक रागांवर प्रभुत्व मिळवलं. तामिळ, तेलगु, कन्नड आणि संस्कृतचा त्यांचा गाढा अभ्यास होता. कर्नाटकी संगीतात त्यांनी अनेक प्रयोग केले. जगभरामध्ये त्यांचे 25 हजारांपेक्षा जास्त कार्यक्रम झालेत. चित्रपटांसाठीही त्यांनी 400 पेक्षा जास्त गाणी रचली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close