पीडितांना मिळाला न्याय

May 6, 2010 9:35 AM0 commentsViews: 6

6 मे

शेकडो लोकांची हत्या करणारा क्रूर दहशतवादी अजमल कसाब याला कोर्टाने फाशी दिल्याने 26/11च्या हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळाला, अशी भावना हा खटला लढवणारे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली.

पाकिस्तानात कट रचून मुंबईत हल्ला करणे, तसेच 166 लोकांची हत्या करणे, याला जबाबदार धरून कसाबला फाशीची शिक्षा दिली गेली. तसेच कसाब आणि त्याच्या साथीदारांनी मुंबईत जे मृत्यूचे थैमान घातले, त्या दहशतवादी कृत्यांसाठी त्याला फाशी सुनावण्यात आली. तसेच भारताशी युद्ध पुकारण्याच्या गुन्ह्याबद्दलही त्याला फाशी सुनावण्यात आल्याचे निकम यांनी सांगितले.

भारतासारख्या लोकशाही देशात आरोपीला बाजू मांडण्याची संधी देत हा खटला चालवून जगापुढे एक आदर्श ठेवण्यात आला, असे निकम म्हणाले.

8 मे 2009मध्ये या खटल्यातील पहिला साक्षीदार तपासला गेला. त्यानंतर एका वर्षाच्या आत 600हून जास्त साक्षीदार तपासण्यात आले. काही लोक सुनावाणीला उशीर झाल्याचा ठपका ठेवण्याचा प्रयत्न करत होते. कसाबने बचावाचा खूप प्रयत्न केले.

सर्कशीतील माकडाप्रमाणे माकडचेष्टा केल्या. भूमिका बदलून कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मी कमी वयाची आहे… मी 26/11च्या हल्ल्यापूर्वीच मुंबईत आलो… मला चिकन बिर्याणी हवी आहे…मला राखी बांधून घ्यायची आहे…सीसीटीव्ही कॅमेर्‍यातील व्यक्ती मी नाही…अशा अनेक कोलांटउड्या कसाबने मारल्या.

नंतर तर गुन्हा कबूल करून त्याने खटल्याला वळण देण्याचाही प्रयत्न केला. मग त्यावर आता खटला कशाला चालवला जातो आहे? असेही आम्हाला विचारले गेले. पण कसाबच्या तो कबुलीजबाब स्वीकारला असता तर फाशीची शिक्षा मागण्याचा आमचा अधिकार समाप्त झाला असता, असे निकम म्हणाले.

शिवाय आज शिक्षा ऐकल्यानंतर क्रूरकर्मा कसाबवर काहीही परिणाम झाला नाही. तो रडला वगैरे नाही. शिक्षा ऐकल्यावर त्याने शांतपणे एक ग्लास पाणी मागितले. पाणी प्यायल्यावर तो पुन्हा शांत बसून राहिला.

कसाबसारखा दहशतवादी हा मानवतेला कलंक आहे. त्याला जिवंत ठेवणे हे चुकीचे आहे. असे कोर्टाने म्हटले. यासोबतच कंदाहारमध्ये विमान अपहरण करणारा दहशतवादी मौेलाना मसूद अजहरला सोडावे लागले होते, याची आठवणही कोर्टाने यावेळी सांगितली. कोर्टाने आमचा युक्तीवाद मान्य केला, याबाबतही उज्ज्वल निकम यांनी समाधान व्यक्त केले.

तर दहशतवाद हा मानवतेवरील डाग आहे. दहशतवाद कोणत्याही धर्म, पंथाचे प्रतिनिधित्त्व करत नाही. दहशतवादाला प्रोत्साहन देणारे देश मोठे पाप करत आहेत, हे त्यांनी लक्षात घ्यावे, असेही निकम यावेळी म्हणाले.

close