दाभोलकर हत्येचा तपास कधी संपवणार?, कोर्टाने सीबीआयला फटकारलं

November 23, 2016 11:41 PM0 commentsViews:

dabholkar case44423 नोव्हेंबर : डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि पानसरे हत्येप्रकरणी मुंबई हायकोर्टाने तपास यंत्रणांची झाडाझडती घेतलीये. तपास यंत्रणा हत्येच्या तपासात चालढकल करुन कोर्टाचा वेळ वाया घालवत असल्याचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलंय. तुम्ही तपास कधी संपवणार ? असा थेट सवाल विचारत कोर्टाने सीबीआयला फटकारून काढलं.

दाभोलकर आणि गोविंद पानसरे प्रकरणी मुंबई हायकोर्टाने आज सीबीआयला चांगलंच फैलावर घेतलं. दाभोलकर खटला हा खटला एका कुटुंबापुरता मर्यादित नाही. उद्या त्या जागी कोणीही असू शकतं. हे फक्त या कुटुंबियांसाठी आहे असं नाही. अशा प्रवृत्तींना रोखणं आवश्यक आहे. हत्येचा तपासासाठी कोर्टानं खूप वेळ दिलाय. आता आणखी वेळ देणार नाही असंही कोर्टाने सुनावलंय.

या प्रकरणाचा तपास कधी संपणार हे तरी सीबीआयनं सांगावं असा टोमणाही कोर्टाने लगावलाय. आरोपींना पकडू शकत नाही हे सीबीआयचं म्हणणं खेदजनक असल्याचंही कोर्टाने म्हटलंय. तपास कधी संपणार ते सांगा, कधी तरी तपास संपवावावाच लागेल. आज अतिरेकी घरापर्यंत आले आहेत. आज कुणीच सुरक्षित नाही. आम्ही आरोपी पकडू शकत नाही असं तपास यंत्रणा संागत असतील तर धक्कादायक आहे अशी तीव्र नाराजीही कोर्टाने व्यक्त केली.

तसंच आम्ही तुम्हाला खूप वेळ दिला आहे पण तुम्ही सतत फक्त कारण देताय आम्ही आता तुम्हाला असं करू देणार नाही. तुम्ही बॅलॅस्टीक अहवाल मिळवण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीयेत. तुमच्या असमाधानकारक कामामुळे आम्हाला प्रश्न विचारण्याशिवाय पर्याय राहिलेला नाहीये असा खेदही कोर्टाने व्यक्त केला.

तर पानसरे प्रकरणी 7-8 दिवसांत या प्रकरणातील प्रगती दिसेल अशी ग्वाही एसआयटीने कोर्टात दिली. पण तुम्ही हा तपास कधी संपवणार, कधी इतर आरोपींना कधी पकडणार? कधी तरी तुम्हाला कारवाई पूर्ण करावी लागेल ना? आम्ही काय अनिश्चित काळासाठी तुमची कारवाई संपण्याची वाट पाहायची आहे का? तुमच्या कडून काही माहिती मिळत नाहीये असे ताशेरेचं कोर्टाने ओढले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close