प्ले-स्कूलमध्ये चिमुकलीला बेदम मारहाण; संचालिकेची जामिनावर सुटका

November 25, 2016 11:31 AM0 commentsViews:

Kharghar FOOTAGE

25 नोव्हेंबर :  नवी मुंबईतील पूर्वा प्ले स्कूलच्या पाळणाघरात अवघ्या 10 महिन्यांच्या चिमुकलीला बेदम मारहाण करण्यात आली आहे. अतिशय निर्दयीपणे चिमकुलीला मारहाण करण्याचा हा सगळा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

खारघर सेक्टर 10 मध्ये पूर्वा प्ले स्कूल आणि नर्सरी आहे. या ठिकाणी काही चिमुकली पाळणाघरात आहेत. पाळणाघरातील आया अफसाना नासीर शेख हिनं एका चिमुकलीला बेदम मारहाण केली. ज्यात मुलीच्या डोक्याला जखम झाली आहे. तिला उपचारासाठी वाशीच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सिन्हा यांनी प्ले स्कूल चालक प्रियांका निकम हिच्याकडे विचारणा केली, तेव्हा असं काही घडलं नसल्याचं सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली. प्ले-स्कूलमधील सीसीटीव्ही फुटेजची मागणीही उडवून लावली. अखेर सिन्हा दाम्पत्याने खारघर पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांच्या निर्देशांनंतर निकम हिने बुधवारी सीसीटीव्ही फुटेज दिले. फुटेज पाहिल्यानंतर मात्र सिन्हा दाम्पत्याच्या पायाखालची वाळूच सरकली.

पाळणाघरात ठेवलेल्या लहान मुलाला ही महिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करतानाची दृश्य कॅमेर्‍यात कैद झालीयेत. ही मारहाण पाहता हे पाळणाघर आहे की चिमुकल्यांची छळछावणी असा प्रश्न पडतोय. पालक मोठ्या विश्वासानं पाळणाघरात मुलांना सोडून नोकरी धंदा करतात. पण पाळणाघरात अफसाना आणि प्रियांकासारख्या महिला मुलांना क्रूर वागणूक देत असल्याचं समोर आलंय.

दरम्यान, याप्रकरणी खारघर पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री आया अफसाना शेख आणि प्ले-स्कूलचालक प्रियांका निकम या दोघींवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करून दोघींना अटक केली. मात्र न्यायालयाने प्रियांका हिची जामिनावर सुटका केली, तर अफसाना शेख हिला 14 दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close