आधी ‘लेस-कॅश’, नंतर ‘कॅशलेस’ अशी वाटचाल असावी – पंतप्रधान

November 27, 2016 1:19 PM0 commentsViews:

modi man ki baat

27 नोव्हेंबर : पंतप्रधानांनी ‘कॅशलेस सोसायटी’ घडवण्याच्या मोहिमेत तरुणाईने उतरावं, त्यांनी जनजागृती करण्यासाठी हातभार लावावा, असं पंतप्रधानांनी आवाहन केलं. पंतप्रधान मोदी यांनी आज ‘मन की बात’मधून देशातील जनतेशी संवाद साधला.

पाचशे आणि हजारच्या नोटा बंद केल्यानंतर मोदींची ही पहिलीच ‘मन की बात’ होती. त्यामुळे या ‘मन की बात’ला विशेष महत्त्व होतं. आधी ‘लेस-कॅश’ आणि नंतर ‘कॅशलेस सोसायटी’ अशी आपली वाटचाल असायला हवी. त्यासाठी मोठा कालावधी लागणार असला तरी रोखीशिवाय आर्थिक व्यवहार करण्यास प्राधान्य देऊन आपण त्यादिशेने पावलं टाकली पाहिजेत, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं.

नोटाबंदीचा हा महायज्ञ आहे. सोनेरी भविष्यासाठी हे पाऊल गरजेचं असल्याचं प्रतिपादनही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’मध्यून केलं आहे. गेल्या 70 वर्षांपासून आजार सहन करत आहोत, त्यामुळे त्यावरील उपचार सोपं नसल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं.

नागरिकांच्या मदतीसाठी केंद्र, राज्य, स्थानिक स्वराज्य संस्था, बँक कर्मचारी, पोस्ट कर्मचारी दिवस-रात्रभर काम करत आहेत. नोटबंदीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 13 हजार कोटी रुपयांचं उत्पन्न जमा झाल्याचंही त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर, नोटाबंदीच्या निर्णयामुळे भारत यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अडचणींच्या काळात शेतकऱ्यांनी मार्ग काढले आहेत. त्यामुळे सरकारनेही आता  शेतकऱ्यांना आणि गावांना प्राथमिकता दिली असल्याचं त्यांनी सांगितलं. नोटबंदीचा एवढा मोठा निर्णय देशातील शेतकरी, कामगार, वंचित-पीडित घटकांच्या हितासाठी घेतला असल्याचंही  पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

श्रीमंतांनी गरिबांच्या आयुष्याचा खेळ करु नये. काहीजण आपल्याकडील काळा पैसा खपवण्याच्या अनेक क्लृप्त्या शोधत आहेत. यासाठी गरिबांना हाताशी धरलं जात आहे. गरिबांनी श्रीमंतांच्या आमिषाला बळी पडू नये, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’मधून केलं.

दरम्यान, यंदाची दिवाळी खास असल्याचं नमूद करत, जनतेने जवानांना शुभेच्छा दिल्यामुळे यंदा दिवाळी साजरी करताना त्यांना एकटेपणा जाणवला नाही, अशी भावना एका जवानाने व्यक्त केली, असल्याचंही त्यांनी देशवासियांना सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close