मूल नगरपरिषदेची निवडणूक प्रतिष्ठेची

November 27, 2016 3:54 PM0 commentsViews:

chandrapur mul

महेश तिवारी, गडचिरोली ,27 नोव्हेंबर :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मूळ गाव असलेल्या मूल नगरपरिषदेच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. इथे चारही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्याने इथली चुरस वाढली आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघातली ही नगरपरिषद आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री या दोघांच्या दृष्टीनं ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातलं राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेलं शहर म्हणजे मूल.राज्याचे माजी मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांचं जन्मगाव, तर विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही हे मूळगाव.फडणवीसांच्या वाड्यापासून काही मीटर अंतरावर असलेली नगरपालिका सध्या भाजपच्या ताब्यात आहे. गेल्या दोन वर्षात अर्थमंत्र्यांनी कोट्यवधी रूपयांचा निधी आणून इथे विकासकामं केली आहेत. नगरपरिषद पुन्हा भाजपच्या ताब्यात आल्यास विकासाची गती वाढेल, असा दावा अर्थमंत्र्यांनी केलाय.

नगराध्यक्षपदासाठी इथं मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्येच होतेय. मुनगंटीवारांनी आमदार म्हणून केलेलं काम हा भाजपच्या प्रचाराचा मुद्दा आहे. तर आरोग्यासह इतर प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप काँग्रेस प्रचारात करतंय.


कामगारांचं शहर म्हणून ओळख असलेल्या बल्लारपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक अत्यंत चुरशीची बनलीय. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीत काँग्रेसमध्ये बंडखोरी झालीय. गेल्या अनेक वर्षांपासून ही नगरपरिषद काँग्रेसच्या ताब्यात आहे. त्यामुळे काँग्रेस विकासाचा मुद्दा प्रचारात आणतेय. तर मुनगंटीवारांनी केलेल्या विकासकामाच्या जोरावर भाजपचा प्रचार सुरू आहे.

मूल आणि बल्लारपूर या दोन नगरपालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसलीय. पण खरी लढत आहे ती भाजप आणि काँग्रेसमध्येच…

प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत जनता कोणाला कौल देतेय ते पाहायचं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close