सिंधुदुर्गात नारायण राणे आणि केसरकरांमध्ये काँटे की टक्कर !

November 27, 2016 4:13 PM0 commentsViews:

rane_Vs_kesarkar

दिनेश केळुसकर,सावंतवाडी, 27 नोव्हेंबर : तळकोकणातल्या नगरपरिषद निवडणुकांत लक्षवेधी आहे ती सावंतवाडी नगरपरिषदेची निवडणूक . केवळ 18 जागांसाठी होणारी ही निवडणूक छोटीशी दिसत असली तरी सिंधुदुर्गाचं राजकारण ढवळून काढणारे दीपक केसरकर आणि काँग्रेसचे मातब्बर नेते नारायण राणे यांच्यात पुन्हा एकदा होणारी ही मोठी लढाई आहे.

नारायण राणेंच्या सिंधुदुर्गातल्या राजकारणाला सुरुंग लावणारे शिवसेना आमदार दीपक केसरकर यांचं होम टाऊन असलेल्या सावंतवाडी नगरपरिषदेची निवडणूक यावेळी चुरशीची ठरतेय. राणेंना आव्हान देत मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्व म्हणजे 17ही नगरसेवक निवडून आणण्याची किमया करणाऱ्या केसरकरांना यावेळी शह द्यायचाच असा राणे गटाने चंग बांधलाय. त्यासाठी राणेंनीही आपली ताकद पुन्हा एकदा पणाला लावलीय.

सावंतवाडीच्याच मोती तलावासारखे शांत दिसणारे दीपक केसरकर राजकारणात किती मुरब्बी आहेत याचा प्रत्यय नारायण राणेंना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी आलेलाच आहे. त्यामुळे केसरकरांना त्यांच्याच इलाक्यात शह देणं काँग्रेसला मुश्कीलच आहे. असं असलं तरी यावेळी सिंधुदुर्गातला भाजप दीपक केसरकरांच्या विरोधात उतरल्यामुळे केसरकरांना गेल्या वेळेसारखे सर्वच्या सर्व नगरसेवक निवडून आणणं अवघड आहे. आणि त्यातही उमेदवारी नाकारण्यात आलेल्या विद्यमान नगरसेवकांची नाराजी केसरकरांची डोकेदुखी वाढवणारी ठरतेय.

दुसरीकडे पालकमंत्री म्हणून केसरकरांना बदला अशी मागणी करणारे सिंधुदुर्गातले भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार ,चिटणीस राजन तेली , भाजपची निवडणूक सूत्रं सांभाळणारे राज्यमंत्री रवी चव्हाण आणि नव्याने भाजपात आलेले संदेश पारकर यांच्या मदतीने केसरकरांच्या विरोधात सावंतवाडी उभी ठाकलीय. पण निवडणुकीसाठी लागणारा केसरकरांसारखा चेहरा सध्या तरी भाजपकडे नाही. शिवाय भाजपचा केसरकरांना होणारा हा विरोध काँग्रेसच्या पथ्यावर पडेल अशीही सध्या सावंतवाडीतली राजकीय स्थिती नाही. अशा परिस्थितीत केसरकरांच्या चौखूर उधळलेल्या घोड्याला लगाम घालण्यात राणे यशस्वी होतात का ते 28 नोव्हेंबरलाच स्पष्ट होणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close