राजेंच्या लढाईत कुणाची बाजी?

November 27, 2016 5:40 PM0 commentsViews:

तुषार तपासे,सातारा, 27 नोव्हेंबर : सातारा जिल्ह्यातही 8 नगरपालिका आणि 6 नगरपंचायतींसाठी मतदान सुरू आहे. यामध्ये सातारा, कराड, वाई, पाचगणी, महाबळेश्वर, फलटण, रहिमतपूर, म्हसवड या नगरपालिकांचा समावेश आहे. तर  कोरेगाव, खंडाळा, मेढा, पाटण, दहिवडी, वडुज या नगरपंचायतींचा समावेश आहे. तरीही या निवडणुकीत सर्वाधिक लक्ष लागलंय ते साताऱ्याच्या निवडणुकीकडे, कारण इथे थेट उदयनराजे आणि शिवेंद्रराजे या दोन राजांमध्ये उभा सामना रंगतोय.

satara_pkg34साताऱ्यात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या पत्नी वेदांतीकाराजे भोसले या नगर विकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत. तर खासदार उदयन राजे यांच्या सातारा विकास आघाडीच्या वतीने माधव कदम या रिंगणात आहेत. या निवडणुकीत आमदार शिवेंद्रराजेंनी पत्नीला उमेदवारी दिल्यानेच उदयनराजेंनी स्वतःचं पॅनल उभं केलंय. त्यामुळे ही निवडणूक आता आमदार विरुद्ध खासदार अशी रंगताना दिसतेय.दरम्यान, वेदांतिका राजेंनी आपल्या उमेदवारीचं जोरदार समर्थन केलंय.

राजघराण्यात उभी फूट पडल्यापासून दोन्ही बाजूंनी सातत्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताहेत, उदयनराजेनी काहीही झालं तरी 40 नगरसेवक निवडून आणणारच असा चंग बांधलाय तर शिवेंद्रराजेंनी राजेंनी फक्त
डॉयलॉगबाजी करत बसण्याऐवजी विकासकामांवरही बोलावं,असा टोला लगावलाय.

या निवडणुकीत वेदांतिकाराजेंसाठी त्यांचे पती आ.शिवेंद्रराजे भोसले प्रचार  करताहेत. तर खा. उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीसाठी उदयनराजे यांच्या पत्नी दामयंतीराजे या सुद्धा प्रचारत उतरल्या आहेत. मात्र त्यामुळे दोन भावांमध्ये प्रमुख लढत वाटत असली तरी  भाजपच्या वतीने देखील सुवर्णा पाटील आणि मनसेच्या वतीने उच्च शिक्षित नवीन चेहरा  प्रिया बाबर त्याच बरोबर प्रकाश आंबेडकरांच्या महाराष्ट्र नागरी विकास आघाडीच्या वतीने सीमा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे सातारा नगरपालिका निवडणुकीत नेमकं कोण बाजी मारतंय याकडे सर्वांचंच लक्षं लागलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close