नगरपरिषदेच्या निवडणुकीत छगन भुजबळांचा सुपडा साफ

November 28, 2016 9:37 PM0 commentsViews:

bhujbal_arrested28 नोव्हेंबर : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी जिंकलेली प्रतिष्ठेची भुसावळ महापालिका आणि गिरीश महाजन यांची येवल्यात यशस्वी ठरलेली रणनीती, यामुळे खान्देशात भाजपनं 8 नगरपरिषदांवर वर्चस्व मिळवलं. तर छगन भुजबळांचा मात्र पूर्ण सुपडा साफ झालाय. येवला, मनमाड आणि सिन्नर या तीनही ठिकाणी राष्ट्रवादीचा पराभव झालाय. तर खान्देशात शिवसेनेनं मुसंडी मारलीये.

खान्देशात एकूण 21 जागा होत्या. त्यापैकी भाजपकडे सर्वाधिक म्हणजे 8 नगरपरिषदा गेल्यात. शिवसेनेला 6 नगरपरिषदांवर वर्चस्व मिळवता आलंय. तर राष्ट्रवादीला खातंही उघडता आलं नाही. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे येवल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या जेलमध्ये असलेले नेते छगन भुजबळ यांना मोठा धक्का बसलाय. कारण येवला आणि नांदगाव दोन्ही नगरपरिषदा त्यांच्या हातातून गेल्यात. येवल्याच्या नगराध्यक्षपदी भाजपचे बंडू क्षीरसागर तर नांदगावच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या राजेश कवडे यांची निवड झालीये. एकूणच भुजबळांकडून या दोन्ही नगरपरिषदा हातच्या गेल्यात.

तर धरणगावमध्ये गुलाबराव पाटील यांनी निर्विवाद वर्चस्व मिळवलंय. नगराध्यक्षपदासह एकूण 14 जागा शिवसेनेला मिळाल्यात. तर चाळीसगावमध्ये शहर विकास आघाडीला एकूण 17 जागा मिळाल्यात. पण चाळीसगावचं अध्यक्षपद भाजपच्या आशालता चव्हाण यांच्याकडे गेलंय.अंमळनेरमध्ये या निवडणुकीच्या प्रचारात सगळ्यांत जास्त राडा झाला होता. अंमळनेरमध्ये सत्ता शहर विकास आघाडीकडे गेलीये. दोंडाईचामध्ये देशमुख विरुद्ध रावल असा संघर्ष होता.

मंत्री जयकुमार रावल यांनी देशमुखांकडून सत्ता खेचून आणलीये. त्यांची आई नयन कुंवर रावल नगराध्यक्षपदी विजयी झाल्यात. तर शेजारच्या शिरपूरमध्ये काँग्रेसनं सत्ता राखलीये. शिरपूरमध्ये काँग्रेसच्या जयश्रीबेन पटेल विजयी झाल्यात. त्याशिवाय मनमाड, सिन्नर, यावल, भगूर या तीनही नगरपालिका शिवसेनेकडे गेल्यात. नाशिक जिल्ह्यात मात्र भाजपला लोकांनी पूर्णपणे नाकारलंय. तर अमळनेर आणि सटाण्यात शहर विकास आघाडीनं सत्ता मिळवलीये आणि रावेरमध्ये जनशक्ती आघाडीची सत्ता आलीये. एकूणच, खान्देशात येवल्यासाठी रचलेली व्यूहरचना यशस्वी झाली आणि खडसेंनी प्रतिष्ठेची भुसावळची निवडणूक राखण्यात यश मिळवलंय. मात्र छगन भुजबळांचं सुपडा साफ झालाय आणि शिवसेनेनंही मुसंडी मारल्याचं दिसतंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close