आता तुमच्या खात्यातून काढू शकता पाहिजे तेवढी रक्कम

November 29, 2016 10:39 AM0 commentsViews:

Cash Withdrawal

29 नोव्हेंबर :  सध्या लागू असणाऱ्या चलनातील रक्कम बँकेत भरल्यास तितकीच रक्कम काढणं खातेदारांना शक्य होणार आहे. त्यासाठी सध्याचे विशिष्ट रक्कम काढण्याचं बंधन लागू नसेल.त्यामुळे आता बँकेतून तुम्हाला पहिजे तेवढी रक्कम काढता येणार आहे, मात्र त्यासाठी काही अटी ही घालण्यात आल्या आहेत. हा निर्णय 29 नोव्हेंबरपासून लागू होणार असल्याचंही रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलंय. तर पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बँकेत भरणाऱ्यांना आठवड्याला केवळ 24 हजार रुपयेच काढता येणार आहेत. रिझर्व्ह बँकेने सोमवारी रात्री याबाबतचे आदेश जारी केले.

पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर सर्व नागरिकांना पैसे मिळावेत यासाठी बँकेतून पैसे काढण्यावर मर्यादा घालण्यात आली होती. आता ही मर्यादा हटवली गेली. आता 24 हजारापेक्षा जास्त रक्कम नागरिकांना आपल्या खात्यातून काढता येईल. ही रक्कम नव्या पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटांमध्ये मिळेल.

दहा नोव्हेंबरपासून २९ नोव्हेंबरपर्यंत किंवा पुढे कोणत्याही व्यक्तीने चालू चलनातील कितीही रक्कम आपल्या खात्यात भरल्यास त्याला तितकीच रक्कम काढता येणं शक्य होणार आहे. या पैसे काढण्यावर कोणतेही निर्बंध असणार नाहीत. म्हणजेच रिझर्व्ह बँकेने चालू चलन बदलून किंवा सुटे पैसे घेण्याचा एक मार्ग खुला केला आहे. बँकांना मात्र, आता कोणी कोणत्या चलनात किती रुपये भरले, याची माहिती घेऊन त्यानुसार पैसे काढण्यास परवानगी द्यावी लागणार आहे, त्यामुळे बँकांची डोकेदुखी वाढली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close