गरीब कल्याण योजना अधिभार आहे तरी काय?

November 29, 2016 10:58 AM0 commentsViews:

 

29 नोव्हेंबर : काळा पैशामागे सध्या सरकार लागलंय, हे जगजाहीर आहे. पण आता काळा पैशावर कर आकारणीसाठी सरकार नवा कायदा आणू शकतं. त्यासाठी आयकर कायद्यात बदलही करण्यात येणार आहे. तसं सुधारणा विधेयक अरुण जेटलींनी लोकसभेत आणलं. आणि हो, या अनेक करांमध्ये एक अधिभार असणार आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अधिभार, असं त्याचं नाव.

जर तुम्ही स्वतःहून काळा पैसा घोषित केलात, तर गणित असं असेल..
– अघोषित उत्पन्नावर 30 टक्के कर
– या कराबरोबरच कराच्या 33 टक्के रक्कम अधिभार म्हणून घेतली जाईल. या अधिभाराचं नाव असेल प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अधिभार.
– अघोषित उत्पन्नावर 10 टक्के दंडही आकारला जाईल
– यानं एकूण कर होतो जवळपास 50 टक्के.
– उत्पन्नाची 25 टक्के रक्कम 4 वर्षांसाठी सरकारकडे जमा राहील

BLACK MONEY CUURENCY

उदाहारण पाहूयात.
समजा अघोषित मिळकत आहे 100 कोटी.
– तर त्यावर 30 टक्के कर म्हणजे 30 कोटी रुपये
– या 30 कोटीच्या 33 टक्के म्हणजे जवळपास 10 कोटी रुपये
– 100 कोटींवर 10 टक्के दंड, म्हणजे 10 कोटी
– उत्पन्नाची 25 टक्के रक्कम 4 वर्षं काढता येणार नाही. म्हणजे 25 कोटी. आता, कर 50 कोटी आणि सरकारकडे 25 कोटी जमा. म्हणजे हातात येणार 100 पैकी फक्त 25 कोटी.

बरं, हे झालं स्वतःहून काळा पैसा घोषित केला तर. सरकारनं अघोषित मिळकत पकडली, तर कर जास्त आहे.
– एकूण उत्पन्नाच्या 60 टक्के कर
– या 60 टक्के कराच्या 25 टक्के प्रधानमंत्री गरीब योजना अधिभार
– एकूण उत्पन्नावर आयकर अधिकारी 10 टक्के दंड ठोठावू शकतो.
– म्हणजे अघोषित उत्पन्नामधून फक्त 25 टक्के तुमच्याकडे उरतील.

या अधिभारामधून जो निधी गोळा होईल तो आरोग्य, पायाभूत सुविधा आणि शिक्षण योजनांसाठी वापरला जाईल. हे करण्यासाठी मूळ आयकर कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे. एकूणच, 2014 साली भाजपनं काळा पैसा समूळ नष्ट करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याच दिशेनं हे आणखी एक पाऊल दिसतंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close