नगरोटाच्या दहशतवादी हल्ल्यात 7 जवान शहीद, 3 अतिरेकी ठार

November 29, 2016 8:23 PM0 commentsViews:

jammu_nagrota_Attack29 नोव्हेंबर : काश्मीरमधल्या नगरोटामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 7 जवान शहीद झालेत. यामध्ये 2 अधिकारी आणि 5 जवानांचा समावेश आहे. शहीद झालेल्या जवानांमध्ये महाराष्ट्राचे 2 जवान आहेत.

जम्मूपासून 20 किमी अंतरावर असलेल्या नगरोटा लष्करी तळावर अतिरेक्यांनी आत्मघातकी हल्ला चढवला. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. या चकमकीत 3 अतिरेक्यांना ठार करण्यात आलंय.

दहशतवाद्यांनी 12 महिला आणि 2 मुलांना ओलीस धरलं होतं. या सगळ्यांची सुखरूप सुटका करण्यात आलीय. जम्मूजवळच्या नगरोटामध्ये हा सीमा सुरक्षा दलाचा मोठा तळ आहे. नदीकाठच्या या लष्करी छावणीच्या बाजूने घनदाट जंगल आहे.

हे दहशतवादी पहाटेच्या सुमारास अधिका-यांसाठीच्या मेसमधून इमारतीत घुसले आणि त्यांनी जोरदार ग्रेनेड हल्ला केला. इथे अजूनही लष्कराची मोहीम सुरू आहे. यासाठी लष्कराने हा पूर्ण भाग ताब्यात घेतलाय. त्यामुळे जवळच्याच हायवेवरची वाहतूकही थांबवण्यात आलीय.

काश्मीरमधल्या उरीमध्ये लष्करी तळावर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात 19 जवान शहीद झाले होते. त्यानंतरचा हा सर्वात मोठा अतिरेकी हल्ला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close