पुण्यात तडीपार गुंड करताहेत गुन्हे

May 10, 2010 5:19 PM0 commentsViews: 67

प्राची कुलकर्णी, पुणे

10 मे

पुण्यामधील गुंडांची तडीपारी रद्द झाल्यानंतरही त्यांच्याकडून गुन्हे करण्याचे प्रकार वाढत आहेत. यामुळे पोलिसांनी तडीपारीविषयीची माहिती प्रसिद्ध करावी, असा अर्ज सजग नागरिक मंचाच्या विवेक वेलणकरांनी केला होता.

मात्र यानंतर फक्त तडीपार करण्यात आलेल्या गुंडांची नावे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. ज्या गुंडांची तडीपारी रद्द करण्यात आली आहे, ती का आणि कधी रद्द करण्यात आली, याचीही माहिती प्रसिद्ध करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे.

गेल्याच महिन्यात पुण्याजवळच्या हिंजवडीमध्ये एका महिलेवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणातील आरोपी सुभाष भोसले याला तडीपार करण्यात आले होते. पण त्याने गृहमंत्रालयात त्याची तडीपारी रद्द करुन घेतली होती.

रविवारी पुण्यातील दत्तवाडी परिसरात गँगवॉरमधून झालेल्या गोळीबारात सचिन कुडले या गुंडाचा मृत्यू झाला. तर त्याचा भाऊ पप्पू कुडले जखमी झाला. या प्रकरणात नीलेश घायवळवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पप्पू कुडले आणि नीलेश घायवळ या दोघांनाही पोलिसांनी तडीपार केले आहे. नीलेश घायवळने त्याची तडीपारी गृहमंत्रालयातून रद्द करुन घेतली आहे.

या पार्श्वभूमीवरच तडीपार करण्यात आलेल्या गुंडांची नावे प्रसिद्ध करण्यात यावीत, अशी मागणी सजग नागरिक मंचाच्या विवेक वेलणकरांनी केली होती. मात्र फक्त तडीपार गुंडांचीच यादी पोलिसांच्या वेबसाईटवर टाकण्यात आली आहे. त्यामुळे ज्या गुंडांची तडीपारी रद्द झाली आहे त्यांचीही नावे प्रसिद्ध करावीत, अशी मागणी वेलणकरांनी केली आहे.

राजकीय वरदहस्तामुळेच गुंडांची तडीपारी रद्द होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी तडीपारी रद्द करण्यामागे कोण आहे, याची चौकशी करुन नावे जाहीर करू, असे आश्वासन वेळोवेळी दिले आहे.

पण एक महिना उलटून गेला तरीही ही नावे जाहिर करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे यात राजकीय हस्तक्षेप असल्याचेच स्पष्ट होत आहे.

close