सरकार म्हणजे डोरेमॉन आणि जनतेचा झालाय नोबिता-विखे पाटील

December 4, 2016 6:32 PM0 commentsViews:

vikhe_patil_4305 डिसेंबर : सरकार हे डोरेमॉन असून जनतेचा त्यांनी नोबिता केल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलीये. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी सरकारच्या धोरणांवर हल्लाबोल केलाय. हे सरकार जनतेला आभासी स्वप्न दाखवत असल्याची टीकाही राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलीये. सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरल्यानं सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचं विरोधकांनी सांगितलंय.

राज्यातील जनतेला त्राही करून सोडणाऱ्या समस्या मार्गी लावण्याची इच्छाशक्ती सरकारमध्ये दिसून येत नसल्याचा आरोप करून विधीमंडळातील विरोधी पक्षांनी आज हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित शासकीय चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घातला. दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी चलन तुटवड्यासाठी सरकारचा नियोजनशून्य कारभार कारणीभूत असल्याचा आरोप करून नोटाबंदीतून काळा पैसा बाहेर येणार असेल तर त्यातून शेतकरी कर्जमाफी करण्याची मागणी केली आहे.

तसंच दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतरही सरकारच्या कारभारात परिपक्वता दिसून येत नाही. हे सरकार वस्तुस्थिती जाणून न घेता केवळ वरकरणी विचार करून आणि प्रसिद्धी केंद्रीत पद्धतीने निर्णय घेत असल्याची टीका त्यांनी केली.

प्रत्येक संकटाच्या वेळी डोरेमॉन आपल्या पोतडीतून एखादे नवीन गॅजेट काढतो आणि त्या गॅजेटच्या आभासी वातावरणालाच वास्तविकता समजून नोबिता त्यात रममाण होतो, अशीच महाराष्ट्राची स्थिती झालीये. शेतक-यांनी कर्जमाफी मागितली, सरकारने जलयुक्त शिवारचे गॅजेट काढले. बेरोजगारांनी नोकरी मागितली, सरकारने मेक इन महाराष्ट्रचे गॅजेट काढले. ग्राहकांनी महागाई रोखण्याची मागणी केली, सरकारने आठवडी बाजाराचे गॅजेट काढले. कायदा व सुव्यवस्था बिघडली, सरकारने अंतर्गत सुरक्षेच्या नव्या कायद्याचे गॅजेट काढले. विरोधकांनी मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे दिले, सरकारने मंत्र्यांना क्लीन चीट देणारे गॅजेट काढले. काळा पैसा रोखण्यात अपयशी ठरले, केंद्र सरकारने नोटाबंदीचे गॅजेट काढले, अशी अनेक उदाहरणे देत विखे पाटलांनी टीका केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close