अंध व्यक्ती कशा ओळखणार नव्या नोटा ?

December 5, 2016 7:18 PM0 commentsViews:

BL10_OC_CORP_SMART_1783702f

05 डिसेंबर : नोटबंदीनंतर आलेल्या 500 आणि 2000 हजार रुपयांच्या नव्या नोटांबद्दल बरीच चर्चा आहे. या नव्या नोटांमध्ये काही त्रुटी राहून गेल्यायत. अंध व्यक्ती या नोटा ओळखू शकत नाहीत, अशी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलीय. नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईंड या संस्थेने ही याचिका दाखल केलीय. येत्या सहा आठवड्यात याबद्दल संबंधितांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आदेश कोर्टाने दिलेत.

नव्या नोटांचा आकार आणि कागद एकाच प्रकारचा आहे. शिवाय ही नोट 500 ची आहे की 2000 रुपयांची हे ओळखण्यासाठी या नोटांवर कोणतीही चिन्हं नाहीत. त्यामुळे पूर्णपणे अंध असलेल्या व्यक्ती तसंच काही प्रमाणात अंध असलेल्या व्यक्तीही या नोटा ओळखू शकत नाहीत. आधीच्या जुन्या नोटांवर काही विशिष्ट चिन्हं होती. त्यामुळे अंध व्यक्तीही या नोटा वापरू शकत होते.

याबद्दल रिझर्व्ह बँकेकडे विचारणा केली तेव्हा काही उत्तर मिळालं नाही. म्हणून आम्ही कोर्टात याचिका दाखल केली, असं नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईंड या संस्थेने म्हटलंय. हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीश मंजुला चेल्लूर आणि एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी करण्यात आली. दरम्यान, नोटबंदीबद्दल याआधी अनेक मुद्द्यांवर याचिका दाखल झाल्यायत. याबद्दल येत्या सहा आठवड्यांत संबंधितांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आदेश कोर्टाने दिलेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close