जयललिता आणि एमजीआर…आता उरल्या फक्त आठवणी!

December 6, 2016 5:51 PM0 commentsViews:

06 डिसेंबर -  जयललितांना अखेरचा निरोप देण्यासाठी लोटलेला जनसागर पाहून सगळ्यांनाच एमजीआर म्हणजेच एम. जी. रामचंद्रन यांच्या अंत्ययात्रेची आठवण झाली. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि अण्णाद्रमुक पक्षाचे नेते एमजीआर यांचं 24 डिसेंबर 1987 ला दीर्घ आजाराने निधन झालं. त्यांच्या पाथिर्वाजवळ उभ्या असलेल्या जयललितांची प्रतिमा सगळ्यांच्याच लक्षात आहे.

एमजीआर यांच्या अंत्ययात्रेमध्ये जयललिता यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक देण्यात आली होती. अण्णाद्रमुक पक्षामधलं अंतर्गत राजकारण त्यावेळी शिगेला पोहोचलं होतं. पण या सगळ्याला पुरून उरत जयललिता धडाडीने पुन्हा राजकारणात उतरल्या. आज याच जयललितांना, आपल्या लाडक्या अम्मांना तामिळनाडूची जनता निरोप देतेय.

तामिळनाडूच्या जनतेने एमजीआर यांनाही जेवढं प्रेम दिलं नव्हतं तेवढं त्यांनी जयललितांवर प्रेम केलंय. पुराच्छी थलैवी म्हणजेच क्रांतिकारी नेता असं बिरुद त्यांनी जयललितांना बहाल केलंय. जयललिता यांची एमजीआर यांच्यासोबतची अभिनयातली आणि राजकीय क्षेत्रातली कारकीर्द खूपच गाजली.

चेन्नईमध्ये एमजीआर यांच्या अंत्ययात्रेनंतरची सगळ्यात मोठी अंत्ययात्रा निघाली ती जयललितांची. चेन्न्नईच्या मरिना बीचवरच्या स्मशानभूमीत जिथे एमजीआर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते त्याच ठिकाणी जयललिताही कायमच्या विसावल्या आहेत. तामिळनाडूच्या जनतेच्या मनात या दोघांच्या आता फक्त आठवणी उरल्यायत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close