मोदी-बीसीसीआयमधील वाद चिघळतोय

May 11, 2010 3:27 PM0 commentsViews: 3

संजीब मुखर्जी,मुंबई

11 मे

मोदी-बीसीसीआयमधील वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. बीसीसीआयने पाठवलेल्या कारणे दाखवा नोटीशीला मोदी या सोमवारी उत्तर देणार असे वाटत होते. पण मोदींनी पाच दिवसांचा जास्त वेळ मागून घेतला आणि बीसीसीआयने त्यांची ही मागणी मान्यही केली. पण या सगळ्यामागे नेमके काय कारण आहे, ते पाहूयात…

सोमवार आला… आणि सोमवार गेला… पण ललित मोदींचा मात्र कुठेही पत्ता नव्हता… बीसीसीआयने पाठवलेल्या कारणे दाखवा नोटीसला उत्तर देण्यासाठी त्यांच्याकडे 15 दिवसांचा वेळ होता… सोमवारी ते याचे उत्तर देणार होते…पण बीसीसीआयच्या मुख्यालयामध्ये त्यांचे आगमन झाले नाही… पण त्यांच्या कायदेतज्ज्ञांची टीम मात्र उशीरा इथे आली….

मोदींनी बीसीसीआयला सकाळी एक ईमेल केला आणि त्यात त्यांनी बीसीसीआयला पाच दिवसांची मुदत मागितली… या मेलमध्ये बीसीसीआयने केलेल्या 22 आरोपांवर उत्तर देण्यासाठी त्यांनी त्यासंदर्भातले काही कागदपत्र मोदींकडे द्यावे, अशी मागणीही मोदींनी केली आहे. त्यातील 8 ते 9 कागदपत्रे बीसीसीआयने देणे आवश्यक आहे.

तोडीस तोड उत्तराची तयारी

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोदीही बीसीसीआयला तोडीसतोड उत्तर देण्यासाठी तयार आहेत आणि सोमवारी ते बीसीसीआय मुख्यालयात यासंदर्भात भेट देणार आहेत. पण त्यांच्या कायदेतज्ज्ञांनी त्यांना असे करण्यापासून रोखले. यात वरिष्ठ वकील राम जेठमलानी यांनी त्यांना प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करण्याचा सल्ला दिला आहे.

मोदींना बीसीसीआयला कुठल्याही प्रकारची संधी द्यायची नाही. बीसीसीआयने लावलेल्या 22 आरोपांवर मोदींचा बचाव करण्यासाठी त्यांचे वकील तयार आहेत. आरोपांचे खंडन करण्यासाठी त्यांनी 1 हजार पानी उत्तर तयार केले आहे. आणि बीसीसीआयमध्ये जाण्याआधी वरिष्ठ वकिलांचाही मोदी सल्ला घेणार आहेत.

बीसीसीआय स्वीकारणार नरमाई

दुसरीकडे बीसीसीआयही मोदी प्रकरणात नरमाईची भूमिका स्वीकारणार असल्याचे दिसते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआयने मोदींनी मागितलेली वेळ मान्य केली आहे. आणि त्यांच्या वकिलांनी मागितलेले कागदपत्र देण्याची तयारीही त्यांनी दर्शविली आहे. आता या युद्धात नेमके कोणाचे पारडे जड राहणार याकडेच सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मोदींच्या उत्तराबाबत उत्सुकता

बीसीसीआयने बजावलेल्या कारणे दाखवा नोटिशीला ललित मोदी येत्या पंधरा मेला उत्तर देणार आहेत. पण यामधील काळात मोदी नक्कीच शांत नाहीत. आणि या नोटिशीला ते काय उत्तर देतात याची जोरदार चर्चा सगळीकडे सुरू आहे. मोदींवर आर्थिक गैरव्यवहार, स्पर्धेचे प्रक्षेपण हक्क विकताना अफरातफर, अशा प्रकारचे 22 आरोप बीसीसीआयने ठेवलेत.

आणि या आरोपांशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे तपासणीसाठी देण्यात यावीत अशी विनंती मोदींनी बीसीसीआयला केली आहे. आणि गंमत म्हणजे आता असे लक्षात येत आहे, की बीसीसीआयकडे ही कागदपत्रेच उपलब्ध नाहीत. मोदींवरच्या चार आरोपांसंबंधातील कागदपत्रे आज बीसीसीआयने त्यांच्या वकिलांकडे सुपूर्द केली. पण इतर व्यवहार फोनवर आणि तोंडी झाल्यामुळे त्याची कागदपत्रे नसल्याचा दावा बीसीसीआयने केला. थोडक्यात बीसीसीआय विरुद्ध ललित मोदी वादातील गुंता वाढत चालला आहे. आणि बीसीसीआयकडे कागदपत्रे नसल्याचा फायदा मोदींना होऊ शकतो.

पाहूयात मोदींनी बीसीसीआयकडे नेमक्या कोणत्या कागदपत्रांची मागणी केलीय…

आरोप नं. 1. – आयपीएल स्पर्धेतील 3 फ्रँचायझींमध्ये मोदींचा छुपा हिस्सा आहे.मोदी – बीसीसीआयकडे यासंदर्भातील काही कागदपत्रे असतील तर कृपया त्यांनी ती मला पुरवावीत.

आरोप नं. 2. – जयपूर आयपीएल क्रिकेट प्रा.लिमिटेडच्या सदस्यांच्या नावांमध्ये घोटाळा…मोदी – बीसीसीआयकडे या नावांचे रजिस्टर असल्यास कृपया त्याची एक प्रत मला देण्यात यावी.

आरोप नं. 3 – आयपीएल टीमच्या लिलावात काही इच्छुक कंपन्यांनी सहभागी न होण्याचे संकेत मोदींकडून देण्यात आले…मोदी – असे संकेत कोणत्या कंपन्यांना देण्यात आले त्यांची नावे कृपया माझ्या वकिलांकडे द्यावीत

आरोप नं. 4. – कोची टीमविषयीचा करार हा बीसीसीआयच्या अध्यक्षांच्या सूचनेनुसार होणं गरजेचे होते. पण प्रत्यक्षात असे झाले नाही.मोदी – असा नियम लिखित असेल तर या नियमाची प्रत मला देण्यात यावी

आरोप नं. 5. – बीसीसीआयशी संलग्न असलेल्या सगळ्या मॅचेसचे प्रसारण हक्क निम्बससोबत असताना एलसीएम या कंपनीला आयपीएलचे हक्क विकले गेले.मोदी – बीसीसीआय आणि निम्बस यांच्यातील कराराची प्रत कृपया पुरवण्यात यावी.

close