आजीने दिला नातवाला जन्म!

December 7, 2016 7:17 PM0 commentsViews:

surrogate ajji 2

07 डिसेंबर :आपण आई व्हावं, आजी व्हावं, असं वाटणं खूप स्वाभाविक आहे. पण इंग्लंडमधल्या वेल्स प्रांतात एक आजी आपल्या
मुलीसाठी सरोगेट मदर बनल्या आणि त्यांनी आपल्या मुलीला मुलगा मिळवून दिला. ज्युली ब्रॅडफोर्ड या 45 वर्षांच्या आजींनी आपल्या नातवाला जन्म दिला, असंच म्हणावं लागेल.

ज्युली ब्रॅडफोर्ड यांची मुलगी जेसिका जेन्किन्स ही 21 वर्षांची आहे. तिला कॅन्सर झाल्यामुळे ती गर्भवती राहू शकत नव्हती. तिच्यावर वेल्स प्रांतातल्या काडिर्फ युनिव्हसिर्टी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. जेसिकावर कॅन्सरचे उपचार सुरू करण्याआधी तिचं बीजांड गोठवून ठेवण्यात आलं होतं. जेसिकापुढे मुलाला जन्म देण्यासाठी सरोगेट मदरचाच पर्याय होता.

या सरोगेट मदर पद्धतीसाठी जेसिकाच्या मदतीला धावून आली तिची आई. ज्युली ब्रॅडफोर्ड जेसिकासाठी सरोगेट मदर बनल्या आणि त्यांनी जॅकला जन्म दिला. गेल्या शुक्रवारी जॅकचा जन्म झाला. जॅकचं वजन, तब्येत सगळंच एकदम छान आहे, असं जेसिका म्हणते.माझी आई खूप धैर्यवान आणि वेगळी आहे. तिने मला तर जन्म दिलाच आणि मला मुलगाही मिळवून दिला, तिच्यामुळे
माझं आई होण्याचं स्वप्न पूर्ण झालं, हेही जेसिकाने आवर्जून सांगितलं.

जेसिका आणि तिचा नवरा रीस हे मूल होण्यासाठी आधुनिक उपचारपद्धती घेत होते. पण ती 18 वर्षांची असतानाच तिला गर्भाशयाचा कॅन्सर झाल्याचं निदान झालं आणि ती गर्भवती राहण्याची आशा मावळली. पण जेसिकाला केमोथेरपी देण्याआधी डॉक्टरांनी तिचं बीजांड गोठवून ठेवलं आणि जेसिकासाठी तिच्याच वयाच्या सरोगेट मदरचा शोध घेतला. पण जेसिकाला कॅन्सर असल्यामुळे तिच्यासाठी सरोगेट मदर मिळणं खूप कठीण होतं.

या सगळ्या अडचणींवर मात करत जेसिकाच्या आईने तिच्यासाठी सरोगेट मदर होण्याची तयारी दाखवली आणि आपल्या
गर्भाशयात जेसिकाचा गर्भ वाढवला. जेसिकाला आई बनण्याची तीव्र इच्छा होती आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला, असं तिची आई ज्युली ब्रॅडफोर्ड मोठ्या मायेनं सांगतात.

जेसिकाचे कॅन्सरचे उपचार आणि मूल होण्यासाठीच्या उपचारपद्धती यासाठी आम्ही अनेक वेळा हॉस्पिटलच्या चकरा मारल्यायत. पण आता जॅकचा जन्म झाल्यानंतर हे सगळं सार्थकी लागलं, असं आम्हाला वाटतं, हेही ज्युली यांनी सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close