आरे कॉलनीत मेट्रो -3 कारशेड प्रकल्पाला केंद्राची तत्त्वत:मान्यता

December 7, 2016 9:08 PM0 commentsViews:

 aarey colony metro
 07 डिसेंबर : बोरिवलीच्या संजय गांधी नॅशनल पार्कच्या हद्दीपासून 4 किलोमीटरचा भाग केंद्र सरकारने इकोसेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर केलाय. पण त्याचवेळी आरे कॉलनीमध्ये होणा-या मेट्रो – 3 कारशेडच्या प्रकल्पाची जागा यातून वगळण्यात आलीय. मेट्रो -3 कारशेड प्रकल्पाला केंद्राने तत्त्वत: मान्यता दिलीय. या निर्णयाला पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी विरोध केलाय.

आरे कॉलनीत मेट्रो रेल्वे कारशेड बांधण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने एक अधिसूचना काढलीय.राज्य सरकारच्या अटी-शर्ती पूर्ण करून मेट्रो – 3 कारशेड बांधता येईल, असं पर्यावरण मंत्रालयाने म्हटलंय. आरे कॉलनीचं जंगल वाचवण्यासाठी झटणा-या पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी आणि वनशक्ती संस्थेने या अधिसूचनेला विरोध केलाय. वनशक्ती संस्थेचे अध्यक्ष स्टॅलिन दयानंद यांनी यासाठी कायदेशीर लढाईची तयारी चालवलीय.

केंद्रीय पर्यावरण मंत्री अनिल दवे यांनी नॅशनल पार्कच्या भोवतीचा भाग हा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला. या भागात कोणतंही बांधकाम करण्याला मनाई करण्यात आलीय. पण आरे कॉलनीमधला मेट्रो कारशेड आणि इतर काही प्रकल्पांसाठीचा 1.60 चौ.मी. चा भाग या निर्बंधांमधून वगळण्यात आलाय.

मेट्रो – 3 कारशेडच्या बांधकामासाठी मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन, वृक्ष प्राधिकरण तसंच इतर परवानग्यांची आवश्यकता लागणार आहे. या परवानग्या घेऊन आरे कॉलनीमध्ये मेट्रो – 3 च्या कारशेडचं बांधकाम झालं तर आरे कॉलनीमधली जैवविविधता धोक्यात येणार आहे. याच कारणांमुळे पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी मुंबई ‘सेव्ह आरे’ ही मोहीमही सुरू केलीय. या मोहिमेला हजारो मुंबईकरांचा पाठिंबा मिळलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close