वरदाह चक्रीवादळामुळे राज्यात काही भागात पाऊस पडण्याची शक्यता

December 13, 2016 11:44 AM0 commentsViews:

527534-461594-cyclone

13 डिसेंबर :  चेन्नईत धुमाकूळ घालणाऱ्या वरदाह चक्रीवादळाचा फटका मराठवाडा आणि कोकणातल्या शेतीला बसण्याची शक्यता आहे.

वरदाह चक्रीवादळ तामिळनाडू, आंध्रप्रदेशच्या किनाऱ्यावरून दक्षिण कोकण आणि मराठवाड्यात धडकण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ ताशी 100 ते 120 किलोमीटर वेगाने रात्री उशिरापर्यंत तामिळनाडूची उत्तर किनारपट्टी पार करेल. त्यानंतर पश्चिम बाजूने पुढे जात ते क्षीण होत जाईल. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या अवकाळी पावसानं कोकणातल्या आंबा आणि काजूच्या पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. तिकडे मराठवाड्यातली कापूस, गहू आणि तांदूळ शेती धोक्यात आली आहे. वरदा चक्रीवादळाची आगेकूच अशीच कायम राहिली, तर शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे.

दरम्यान, चेन्नईत धडकलेल्या वरदा वादळामुळे 10 जणांचा मृत्यू झाला आहे. चेन्नईसह आंध्र प्रदेशातही वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळतो आहे. अनेक झाडं उन्मळून पडली आहेत तर लोकल वाहतूक मंदावली आहे. खबरदारी म्हणून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली गेली आहे. ताज्या माहितीनुसार, या वादळाचा प्रभाव कमी होत असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. उद्यापर्यंत हे वादळ दक्षिण गोव्याकडून गुजरातच्या दिशेला सरकणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close